स्वाइन फ्लू मृतांचा आकडा 82 वर

0

पुणे । शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून या आजारामुळे बळी जाणार्‍या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकताच एका 55 वर्षीय रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 82 वर पोहचला आहे. तर 33 स्वाइन फ्लू बाधीत रुग्णांवर उपचार सुरू असल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण शहरात व आजूबाजूच्या परिसरात आढळण्यास सुरुवात झाली होती. जानेवारी पासून आत्तापर्यंत तब्बल 405 रुग्ण स्वाइन फ्लू बाधीत आढळले असून 290 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. नुकताच मृत पावलेल्या आंबेगाव येथे राहणार्‍या रुग्णाचे 1 ऑगस्ट रोजी घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दुसर्‍याच दिवशी त्याला स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले. एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान 7 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला. सध्या 22 रुग्ण हे व्हेंटिलेटर वर असून त्यांच्यावर विविध रुग्णालायात उपचार सुरू आहेत. मंगळवारी 3 हजार 344 संशयीत नागरीकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 213 रुग्णांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले आहे. तर 6 रुग्ण स्वाइन फ्लू बाधीत आढळले आहेत.