कल्याण : स्वाइन फ्लू आजाराला पोषक वातावरण तयार होत असल्याने प्रत्येकाने हा आजार होऊ नये, याकरिता काळजी घेण्याचे आवाहन उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांनी केले आहे.
स्वाइन फ्लूचे विषाणू हवेत आठ दिवस जिवंत राहू शकतात. स्वाइन फ्लूग्रस्त व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकण्याने हे विषाणू पसरतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यांच्याशी संपर्क झाल्यास त्यांचे संक्रमण होते. या आजाराची लक्षणे सर्वसाधारण तापासारखी असतात. थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब इत्यादी लक्षणे या आजारात आढळतात, अशी माहिती त्यांनी दिली.आपले नाक व तोंड रुमालाने झाकावे, शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे, हात साबण व स्वच्छ पाण्याने धुवावेत, आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी, सर्दी, खोकला यापैकी काही लक्षणे आढळल्यास प्रवास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, ज्यांना श्वसनाचे आजार आहे, त्यांच्याशी संपर्क टाळावा, भरपूर झोप घ्यावी, द्रव ,पातळ पदार्थांचे जास्त सेवन करावे व पौष्टिक आहार घ्यावा, आजारी असल्यास शक्यतो घरीच राहावे, घरातील हवा मोकळी राहील, याची दक्षता घ्यावी, तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, अशा काही उपाययोजना उपसंचालकांनी सांगितल्या. सर्व सरकारी रुग्णालयात स्वाइनची औषधे उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांना दाखल करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वंतत्र वॉर्ड ठेवण्यात आला आहे. गरोदर माता, ० ते ५ वयोगटातील लहान बालके, ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजारी व्यक्तींकरिता स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.