निगडी व आकुर्डीत दोन महिलांचा मृत्यू; मृतांचा आकडा 43 वर
पिंपरी-चिंचवड : शहरात स्वाईन फ्लूची साथ जोरात सुरू आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असताना स्वाईन फ्लूचा कहर नियंत्रणात येत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी शहरात स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यात निगडी येथील एका 63 वर्षीय वृद्धेचा तर आकुर्डीतील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृतांचा आकडा 43 वर गेला आहे.
उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वाईन फ्लूने सध्या थैमान घातले आहे. या रोगाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. निगडी येथील 63 वर्षीय महिलेवर 13 सप्टेंबर आणि आकुर्डीतील 50 वर्षीय महिलेवर 4 सप्टेंबरपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या सातत्याने वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
ही आहेत प्रमुख लक्षणे
सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या घ्याव्यात, त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.