कल्याण : खाजगी रुग्णालयात सर्दी, खोकल्याच्या तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची भीती दाखवत त्यांना एच1 एन1 ची तपासणी करून घेण्यास भाग पाडले आहे. यात रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी केला आहे. तसेच ही लूट थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने संबधित डॉक्टरांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी करत याबाबतचे निवेदन त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहे. यंदा जून महिन्यापासूनच स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून यातील काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे स्वाईनबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीचा फायदा घेत काही संधी साधू डॉक्टरांनी व्यवसाय सुरू केला आहे.
10 हजारांचा भुर्दंड
सर्दी, खोकल्यासारख्या सध्या आजारावरील उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना देखील खाजगी डॉक्टर स्वाईनची भीती घालत तातडीने तपासणी करून घेण्याचा सल्ला देत आहेत. एवढ्यावरच न थांबता आपल्या ओळखीच्या लॅब टेक्नीशियनला बोलावून रुग्णाचे रक्त, लघवी आणि कफाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात असून स्वाईनची तपासणी 7 ते 8 हजार रुपयापर्यंत तर कफ तपासणीसाठी 800 ते 1000 रुपयाची फी आकारली जात असून गरीब रुग्णांना या तपासणीचा तब्बल 10 हजार रुपये भुर्दंड सोसावा लागत आहे.
प्रशासनाकडून कारवाईचे संकेत
रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसतानाही डॉक्टराकडून रुग्णांना शासकीय लॅबचा पत्ता किंवा संपर्क देखील न पुरविता स्वत:ची टक्केवारीमधील कमाई या खाजगी डॉक्टरांनी सुरु केली आहे. त्यामुळे लॅबच्या संगनमताने रुग्णाची लूट केली केली जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहे. अशा प्रकारे गरीब रुग्णांची फसवणूक करणार्या खाजगी डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत डॉ रोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारे आलेल्या तक्रारीनंतर संबधित डॉक्टरांना समज देण्यात आली असून तरीही रुग्णाची लूट सुरु असेल तर संबधित रुग्णांनी डॉक्टराच्या नावाने तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.