स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

0

आरोग्य विभागाकडून माहिती

पुणे :  शहरात उन्हाची तीव्रता वाढूनही स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. वाढत्या प्रादूर्भावामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांमध्ये वाढ होत असून, सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत एकूण 24 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 12 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ढगाळ वातावरण आणि मध्येच उन्ह यामुळे वातावरणात बदल झाला असून सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

मागील पंधरा दिवसांत पुन्हा संसर्ग वाढला

जानेवारी महिन्यात शहरात स्वाईन फ्लूने तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवस स्वाईन फ्लू आटोक्यात होता. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून पुन्हा संसर्ग वाढला आहे. दोन दिवसांत 6 हजार 800 हून अधिक व्यक्तींची स्वाईन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन व्यक्तींना संसर्ग झाल्याचे समोर आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 90 व्यक्ती संशयीत म्हणून आढळून आले. त्यांना टॅमीफ्लूची देऊन घरी सोडण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत (1 जानेवारी 2019 पासून) 2 लाख 07 हजार 905 व्यक्तींच्या तपासणीतून 89 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 2 हजार 768 व्यक्तींना टॅमीफ्लू देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.