भुसावळ । शहरातील जामनेर रोडवरील रहिवासी तसेच मुक्ताईनगर वनविभागातील कर्मचारी गजानन तुकाराम पोळ (वय 43) यांचा शुक्रवारी स्वाईनफ्लू आजाराने मृत्यू झाल्याने शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने आरोग्य विभाग खळबडून जागा झाला असून रुग्णालयात टॅमीफ्लूच्या प्रतिबंधात्मक गोळ्या देणे आदी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
रक्त तपासणीअंती स्वाईन फ्लूचे झाले निदान
गजानन तुकाराम पोळ (वय 43) यांना गेल्या आठवड्यापासून ताप, सर्दी आदींचा त्रास होत असल्याने शहरातील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले मात्र निमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना जळगावच्या खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. प्रकृती बरी होत नसल्याने कुटुंबियांनी औरंगाबाद येथील एमआयटी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी केलेल्या रक्ततपासणीत त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.
स्वाईन फ्लूमुळे बळी गेलेल्या पोळ यांच्या कुटूंबियांची माहिती घेत आहोत, पालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक या भागात गेले असून माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार टॅमी फ्लूच्या गोळ्या देणे किंवा अन्य उपचार केले जातील.
– डॉ. किर्ती फलटणकर,
वैद्यकिय अधिकारी, न.पा.भुसावळ.