स्वातंत्र्यदिनी शिवाजी पार्कजवळ देशभक्तीचा भव्य `एल्गार’

0

कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, कोणत्याही जाती-धर्माची जोड नाही तर केवळ भारतीय म्हणून एकत्र येऊन आपली देशभक्ती प्रगट करणारा 15 ऑगस्ट 2017 चा स्वातंत्र्यदिन सोहळा दादरच्या शिवाजी पार्क येथील राजा बढे चौकाजवळ होणार आहे. यासाठी मुंबईमधील विविध राजकीय पक्ष, संघटना व संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रभक्ती समिती स्थापन केली आहे. यावेळी कर्नल ए. के. मोरे व कॅप्टन डी. के. सिंग तसेच आजी-माजी निवृत्त लष्करी अधिका-यांकडून झेंडावंदन केले जाणार आहे. या शानदार सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था हे आपापले वैचारिक मतं बाजूला ठेवून यात सहभागी होणार आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनात देशभक्ती आहे, पण आजच्या धावपळीच्या वातावरणात ती व्यक्त करणेही शक्य होत नाही. त्यामुळेच ही संधी साधून केवळ भारतीय म्हणून एकत्र येऊन आपल्या देशावरील निष्ठा व्यक्त करणाचा हा एक उपक्रम आहे. देशाला बाह्य शक्तीपासून धोका आहे. त्यांच्यावरदेखील या एकात्मतेमुळे दबाव येणार आहे. त्याचबरोबर एकेकाळी विज्ञान, संस्कृती, संपत्ती अशा सर्वच पातळ्यांवर सर्वोच्च स्थानी राहिलेल्या आपल्या देशाला पुन्हा तेच स्थान मिळवून देण्याची प्रेरणा या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना निश्चित मिळेल, असा विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला आहे.

या वेळी स्वातंत्र्यदिनाला शोभेल अशी वेशभूषा करून येणा-या मंडळास 11 हजार रुपये, 7 हजार रुपये, 5 हजार रुपये अशी पहिली तीन पारितोषिके दिली जातील. त्याचे परिक्षण भारतकुमार राऊत, अचला जोशी व वंदना गुप्ते करतील. या उपक्रमात शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी सहभागी होत आहेत. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्ष, संघटना, संस्था तसेच नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि आपली ताकद दाखवून द्यावी, अशाप्रकारचे हे अनोखे झेंडावंदन मुंबईत शिवाजी उद्यानात माँसाहेब ठाकरे पुतळ्याजवळ होणार असून त्याची व्याप्ती येणा-या काळात विस्तारीत व्हावी, अशी अपेक्षा आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.