आळंदी : आळंदी परिसरात स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीची गाणी, तिरंगा, गाड्यांवर फडकणारे राष्ट्रध्वज आणि कित्येकांनी आपल्या कपड्यांवर सजविलेल्या तिरंग्याच्या बॅच आणि झेंड्यांनी संपूर्ण वातावरण चैतन्यमय करून टाकले होते. 15 ऑगस्टच्या दिनी वातावरण इतके अप्रतिम झाले होते की प्रत्येकाच्या नसानसांमध्ये देशभक्ती संचारली होती.
पद्मावती मंदिर प्रांगणात ध्वजवंदन
शालेय मुलांच्या प्रभात फेरीने उत्साहात रंग भरला. प्रभात फेरीत शालेय मुलांनी घोषणा देत जनजागृती केली. प्रभात फेरी कालावधीत वरुणराजाने हलकासा शिडकावा केला आणि उत्साहाला जणूकाही उधाणच आले. आळंदी देवस्थानच्या वतीने संस्थान कमेटीचे वतीने पद्मावती मंदिर प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचेसह देवस्थानचे कर्मचारी, पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
महाद्वार प्रांगणात यात्रा समितीचे सभापती ज्योती चिताळकर पाटील यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. येथील कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले.या प्रसंगी माजी नगरसेवक कार्याध्यक्ष देवराम घुंडरे यांचे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आळंदी नगर परिषद कार्यालयाचे स्थलांतरित सांस्कृतिक भवन (टाऊन हॉल) प्रांगणात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. या प्रसंगी मुख्याधिकारी समीर भूमकर,उपाध्यक्ष प्रशांत कु-हाडे नगरपरिषदेचे पदाधिकारी,कर्मचारी वृंद,नागरिक उपस्थित होते.आळंदी ग्रामीण रुग्णालयात ध्वजवंदन करण्यात आले.या प्रसंगी क्रांती पार्क मध्ये क्रांती ज्योत प्रज्वलित करून कार्यकर्ते आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित झाले. रुग्णालययात देखील प्रजासत्ताकदिन कार्यक्रम झाला.
लक्षवेधी खेळ
येथील ज्ञानज्योत इंग्लिश स्कूल मध्ये माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे पाटील यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विश्वस्त विठ्ठलराव घुंडरे यांचे हस्ते ध्वज पूजन करण्यात आले.श्री सरस्वतीपूजन,महात्मा गांधी प्रतिमा पूजन माजी उपाध्यक्ष वासुदेव घुंडरे,विश्वस्त राजेंद्र घुंडरे उपस्थित होते.यावेळी शालेय मुलांनी लेझीम पथकाने पालक-नागरिकांची मने लक्षवेधी खेळ सादर करून वेधून घेतली.
ठिकठिकाणी ध्वजारोहण
आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा केंद्रात उपाध्यक्ष प्रशांत कु-हाडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी पाणी पुरवठा केंद्रातील कामगार उपस्थित होते. येथील ज्ञानगंगा इंग्लिश स्कुल, आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक 1 ते 4 मध्ये अनुक्रमे नगरसेविका प्राजक्ता घुंडरे, नगरसेवक सागर भोसले, नगरसेविका प्रमिला रहाणे, नगरसेवक सागर बोरुंदीया यांचे हस्ते झाले. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विश्वस्त प्रकाश काळे, ध्यास फाउंडेशनचे विश्वस्त सुरेश वडगावकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चावडी कार्यालय, एल.वि.दुराफे स्कुल मध्ये नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. आळंदी बस स्थानकात प्रभात फेरीने आलेल्या नगरपरिषदेच्या 4 शाळांमधील मुलांचे विविध लक्षवेधी विविध गुणदर्शन अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले. नगरपरिषदेच्या वतीने आळंदीतील विविध शाळांमध्ये मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग निधीचे वाटप
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने शासन नियमानुसार दिव्यांग व्यक्तींचे विकासासाठी उपलब्ध निधीतील 4 लाख रुपयांचे वाटप नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते प्रथमच करण्यात आले. 80 पात्र दिव्यांग लाभार्थींना प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 4 लाख रुपयांचे वाटप नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. आळंदी परिसरातील विविध ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले.
आळंदी मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी
गोकुळाष्टमी सप्ताह श्री कृष्ण आणि माउलींचा जन्मोत्सव, दहीहंडी, सप्ताहातील काला तसेच श्रावण महिन्यातील सोमवार, सलग आलेल्या सुट्या यामुळे आळंदी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सुसंवाद साधत भाविकांच्या सुखकर आणि सुलभ दर्शनास मंदिरातील प्रथांचे पालन करीत कर्मचा-यांच्या सहकार्याने नियोजन केले. मंदिर परिसरात भाविकांचे गर्दीने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. मंदिर परिसरात दुतर्फा वाहन पार्किंगची भाविकांना रहदारीस गैरसोय झाली. दगडी पायर्यांवरून वाहन पार्किंगने ये-जा करण्यास भाविकांना त्रास झाला. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
धानोर्यात सामाजिक उपक्रमांनी उत्साहात ध्वजारोहण
आळंदी – मरकळ रस्त्यावरील पॉलीबॉण्ड इंडिया प्रा.लि. या कारखान्यात 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण करण्यात आले, तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कंपनीचे एच.आर.राकेश यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कंपनीतील सर्व कामगार, सुरक्षारक्षक तसेच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी सुरक्षा रक्षक प्रतिनिधी जे.एच.सपकाळ यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मधुभाऊ राठी यांचे मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक एम.बी.फणसे, सुरक्षा प्रबधंक एस.एस. राऊत, ग्रेटवॉल ऑपरेशन मॅनेजर अविनाश मिरगे, सिक्युरिटी ऑफिसर पी.एस. निकम, हेड गार्ड एस.एस.राईकवार, बाप्पु पवार,राकेश, एस.एस.खोपे, एस.के.अवसरमोल, डी.आर.शेखर, जी.डी.वाघमारे, धानोरे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब रोकडे आदींसह येथील स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेलगाव ग्रामसभेत वृक्षारोपण, घरकुल, स्वच्छता निर्णय
ग्रामपंचायत शेलगाव येथे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी ग्रामसेविका शीतल भालशिंग, सरपंच ज्योती आवटे, उपसरपंच एकनाथ आवटे यांचे सह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शासन निर्णय नुसार ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शासनाचे शतकोटी वृक्षारोपण, घरकुल योजना, स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम आदी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
चर्होलीत विविध गुणदर्शन
चर्होली खुर्द ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशालेत ठाकरवाडी चर्होली खुर्द येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच काळूराम थोरवे होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच कुसुम गायकवाड तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच युवा नेते हनुमंत थोरवे ,राहुल थोरवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास केवळ, सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर करीत मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपत शेळके यांनी केले. उपस्थित सर्वच मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या तसेच कामकाजाचे कौतुक करून या पुढील काळात अधिकच विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी रॉबिन हूड आर्मी पुणे या संस्थेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. सांगता अध्यक्ष सरपंच काळूराम थोरवे यांच्या मनोगताने झाली. चर्होली परिसरातून 150 ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.