स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी पाट्या लावणार्‍यांचा सन्मान

0

पुणे । दैनंदिन जीवनात शेकडो लोकांशी संवाद साधणा-या पुणेरी व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाद्वारे मराठीपण जपले आहे. दुकानावरच्या मराठी पाटया आणि ग्राहकांशी बोलताना मराठी भाषेचा वापर यांमुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे व्रतच या जुन्या व्यावसायिकांनी घेतल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे अगदी 133 वर्षांपूर्वीपासून आपल्या दुकानावर मराठी पाटया अभिमानाने लावणा-या अशाच व्यावसायिकांचा सन्मान जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात आला. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे बाजीराव रस्त्यावरील जनता बँकेशेजारी असलेल्या गोविंद दाजी जोशी आणि कंपनी-लकडे सुगंधी यांच्या 133 वर्षे जुन्या दुकानासमोर या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जनता सहकारी बँकेचे संचालक अभय माटे, सचिन जोशी, देसाई बंधू आंबेवालेचे वसंतराव देसाई, नगरसेवक राजेश येनपुरे, अ‍ॅड. गायत्री खडके, संस्थेचे अध्यक्ष मदनसिंह रजपूत, सचिव नितीन पंडित, गणपत जैन, अनिल प्रभुणे, सुरेश नेऊरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप कुंभोजकर यांनी आभार मानले.

ग्रंथात मराठीचे वैभव
अभय माटे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषा बोलण्यास आजच्या पिढीला अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत अनेक व्यावसायिक मराठीच्या प्रचाराकरीता मराठी भाषा दैनंदिन व्यवहारात जपत आहेत. मराठी भाषेचे सौंदर्य अवर्णनीय असून दासबोध, ज्ञानेश्‍वरी सारखे ग्रंथ हे मराठीचे खरे वैभव आहे.

व्यावसायिकांचा सन्मान
गोविंद दाजी जोशी आणि कंपनी – लकडे सुगंधी, कावरे आईस्क्रिम, देसाई बंधू आंबेवाले, नया संसार, दाते आंबेवाले, गोरे आणि मंडळी, हॉटेल सत्यम, स्वानंद एजन्सी, साठे ब्रदर्स, जीवन जनरल स्टोअर्स, प्रभात जनरल स्टोअर्स, दिनशा अँड कंपनी, चंदेल प्लेट डेपो, कॉटनकिंग, राजेश जनरल स्टोअर्स आदी व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला.

मराठी भाषेत आपुलकी
वसंतराव देसाई म्हणाले, मराठी भाषेमध्ये आपुलकीपणा आहे. जुने दुकानदार मराठी भाषेचा वापर करीत ग्राहकांशी संवाद साधतात. मराठी पाटया साकारण्यामध्येदेखील व्यावसायिकांची कल्पक बुद्धी आहे असेही त्यांनी सांगितले.