स्वातंत्र्यविरांच्या उडीचे औचित्य साधून चीनी वस्तूंवरील बहिष्काराची मोहिम सुरू

0

जळगाव। चीनकडून भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण झालेला आहे. पाकिस्तानशी सैनिकी युती करून खुल्या आर्थिक धोरणाचा गैरफायदा घेऊन तकलादू वस्तू विकून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहात आहे. चीनचे धोरण हाणून पाडण्याची जबाबदारी ागरिकांनीच ती आपल्या खांद्यावर घ्यावी म्हणून आम्ही आजपासून चीनी मालावर बहिष्कार मोहिम सुरू करत आहोत, अशी माहिती विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आज येथे दिली. ते मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्वा. सावरकरांकडून प्रेरणा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनहून भारतात परततांना इंग्रज सरकार राजद्रोहावरून आपल्याला अटक करणार हे लक्षात येताच 8 जुलै रोजी (1910) समुद्रात उडी घेवून फ्रांसचा किनारा गाठला होता. या दिवसाचे औचित्य साधून ही मोहीम आज 8 जुलैपासून सुरू केली जात आहे. भारताचे स्वातंत्र्य हे सावरकरांच्या उडीचे उद्दिष्ट होते आणि सार्वभौमत्वाची सुरक्षा हे नागरिक म्हणून आम्ही सुरू करत असलेल्या या आंदोलनाचे उद्दिष्ट आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.
जळगाव पॅटर्न व्हावा: व्यापारी महामंडळांतर्गत मोडणार्‍या सर्व व्यापारी संघटना, विक्रेता संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सवात चीनी मूर्तींवर तर दिवाळीत चीनी फटाक्यांवर बहिष्काराला प्राधान्य राहील. प्रत्येक सणाला असा उपक्रम राबवला जाईल. विद्यार्थ्यांची रॅलीही या मोहिमेंतर्गत काढण्यात येईल. जनजागृतीसाठी एक लाखावर पत्रके वाटली जातील. चीनी वस्तूंवरील बहिष्काराचा ‘जळगाव पॅटर्न’ बनवून व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न असेल.

चिनी वस्तूंचा बायकॉट
चीनने पाकिस्तानच्या सहकार्याने भारताच्या सीमेवरून, सीमेतून महामार्गाची निर्मिती सुरू केली. सिमेवर नियमितपणे चीनी सैंनिक भारतीय सैनिकांसोबत उर्मट वर्तन करत असतात. दुसरीकडे चीनी वस्तूंचे मार्केट भारतात इतके वाढलेले आहे, की त्याचा फटका अनेक भारतीय उद्योगांना बसलेला आहे. इथले अनेक कारखाने बंद पडण्यापर्यंत या फटक्याची मजल गेलेली आहे. चिनी वस्तूंचा बायकॉट करायला हवा, चीनी वस्तू खरेदी करणे थांबवायला हवे. स्वस्त मिळाले म्हणून वीष विकत घेणार का, असा प्रश्नही सोनवणे यांनी केला.