सोमवारी होणार वितरण समारंभ
पिंपरी : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि सावरकर जयंतीनिमित्त राष्ट्रभक्ती, समाजसंघटन, प्रबोधन, सेवा अशा क्षेत्रात भरीव कार्य करणार्या संस्थांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार डॉ. आंबेडकर वनवासी कल्याण ट्रस्ट (सुरत) या संस्थेला, तर राज्यस्तरीय पुरस्कार यशवंतराव चव्हाण मोफत वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (विटा) या संस्थेला देण्यात येणार असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी जाहीर केले.
निगडी प्राधिकरणातील सावरकर सभागृहात सोमवारी (दि. 28) सायंकाळी साडेसहा वाजता खासदार अमर साबळे यांच्या हस्ते व भारत भारतीचे संस्थापक विनय पत्राळे यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. या प्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार एक लाख रुपये व राज्यस्तरीय पुरस्कार 51 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
डॉ. आंबेडकर वनवासी कल्याण ट्रस्ट ही संस्था ‘नर सेवा हीच नारायण सेवा’ हे ब्रीद घेऊन काम करते. समाजरूपी परमेश्वराची सेवा करण्याच्या हेतुने 1999 सालापासून गुजरातमधील डांग जिल्ह्यातील वनवासी बंधूंच्या कल्याणासाठी या ट्रस्टची स्थापना झाली. दक्षिण गुजरातमधील आदिवासीबहुल डांग व तापी जिल्हा हे संस्थेचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. या दोन जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त वनवासी गावातील वंचित बांधवांसाठी ही संस्था गेली 19 वर्षे झटत आहे. वंचित वनवासी बाधंवासाठी शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, जैविक शेती विषयक प्रकल्प राबविले जात असून सामाजिक समरसता व वंचितांचा स्वाभिमान जागवून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरू आहे. तर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेली यशवंतराव चव्हाण मोफत वाचनालय ही संस्था प्रशासकीय सेवेत जाण्याची क्षमता व इच्छा असणार्या होतकरू विध्यार्थ्यांसाठी ही संस्था कार्यरत आहे. देव, देश आणि धर्म यासाठी निस्पृह, निरपेक्ष, निस्वार्थी, कार्यक्षम आणि पारदर्शी अधिकारी घडविण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहे. सुमारे 250 पेक्षा जास्त विद्यार्थी नियमित या सुविधेचा लाभ घेत आहेत. गरजू मुलांसाठी विनाशुल्क निवास व भोजनाची सोय ही संस्था करते.