पालमधील प्रकाराने खळबळ ; घराला बाहेरून कुलूप असल्याने संशय वाढला
रावेर- तालुक्यातील पाल येथे स्वातंत्र्यसैनिक भगवान भोई यांच्या पत्नी सुशीला भोई (वय 70) यांचा घरात कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी रावेरात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. सुशीला भगवान भोई या पाल येथे एकट्याच राहत होत्या. त्यांना एक मुलगा आणि चार विवाहित मुली आहेत. दसर्यानिमित्त त्या बाहेर गावाहून पाल येथील राहत्या घरी आल्या होत्या. दसर्याच्या दिवशी जावई चंदू भोई यांनी त्यांची विचारपूस देखील केली होती. मात्र, दसर्याच्या दुसर्या दिवसापासून सुशीलाबाईचा फोन बंद येत होता. घर देखील कुलूप बंद घर दिसल्याने त्यांनी नातेवाईकांना विचारणा केली. मात्र, त्या कुठेही मिळून आल्या नाही. शेवटी त्यांनी घराजवळ जाऊन पाहिल्यानंतर आतून दुर्गंधी आली. यामुळे संशय बळावताच त्यांनी पोलिस स्टेशनला कळवले. पाल दूरक्षेत्रचे जितेंद्र जैन, संदिप धनगर यांनी घराचे कुलूप उघडून प्रवेश करताच त्यांना महिलेचा पलंगावर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला मात्र ज्या घरात सुशीलाबाईंचा मृतदेह आढळला, त्या घराला बाहेरुन कुलूप होते. त्यामुळे घातपाताचा संशय बळावला आहे. रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याने उपनिरीक्षक अमृत पाटील, सहायक फौजदार जितेंद्र जैन यांनी तपासाला वेग दिला आहे.