आगार मालवा । आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले आहे, तरी देशात अजून समानता आलेली नाही. लोकांच्या मनातून अजूनही जातीपातीचा अहंकार गेलेला नाही. आजही दलितांना बरोबरीने जगण्याला विरोध होतो. त्यांनी शिकावे, इतरांसारखे वागावे हे आजही जातंध्यांच्या मनाला पटत नाही. मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे. मानगावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दलित समाजातील एका युगुलाच्या लग्नाची वरात ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली. मात्र या वाजत गाजत वरात काढण्यास जातंध्यांनी विरोध केल्याने पोलिसांना बंदूक, अश्रुधुराचे नळकांडे आणि मोठा फौजफाटा घेऊन वरातीला संरक्षण द्यावे लागले.
आगर मालवापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर मानगाव आहे. 2 हजार लोकसंख्येच्या या गावात जवळपास 55 दलित कुटुंब राहतात. सवर्ण समाजाचे प्रभुत्व असलेल्या या गावात स्वातंत्र्यानंतर आजवर कधीही दलित समाजाच्या लग्नाची वरात कधीच वाजत गाजत निघाली नाही. मात्र इथं राहणार्या चंदर मेघवाल या व्यक्तीने त्याच्या मुलीचे लग्न ढोलताशाच्या गजरात करण्याचे ठरवले. त्याची मुलगी ममता हिचा राजगढ येथील दलित व्यक्ती दिनेशशी विवाह ठरला. मेघवाल त्यांच्या मुलीच्या लग्नाची वरात वाजत गाजत काढणार असं माहिती झाल्यावर त्याला गावातील सवर्णांनी विरोध केला. त्यांच्या मुलीचे लग्न उधळून लावण्याची धमकी देण्यात आली. मात्र याला न जुमानता त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न वाजत गाजत करायचे ठरवले आणि प्रथमच दलित वस्तीत ढोलताशांचे सूर ऐकावयास मिळाले.
गावातील काही लोकांनी लग्नात ढोलताशे न वाजवण्याचा इशारा दिल्यानंतर मेघवाल यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. लग्न उधळून लावण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वरातीला पोलीस संरक्षण देण्याचा निश्चय केला. पोलिसांनी तातडीने सुसनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार तथा सुसनेर पोलिसांशी संपर्क साधून मेघवाल कुटुंबीयांचा लग्न सोहळा सुरक्षित तथा थाटामाटात पार पाडण्यासाठी मदत केली. या सोहळ्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, अशी माहिती विभागीय दंडाधिकारी जी. एस. डावर यांनी दिली.
घोडीवर बसण्यास बंदी
या परिसरातील गुज्जर समाजाने गेल्या अनेक वर्षांपासून दलित नवरदेवाला घोडीवर बसण्यास बंदी घातली आहे. तसंच दलित समाजाला त्यांचे लग्नकार्य हे वाजत गाजत करण्यास बंदी घातली आहे. मात्र गावातील हा जात्यंधांनी केलेला नियम मेघवाल यांनी तोडला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास बंदी येऊ शकते, तसंच त्यांना मंदिर प्रवेशालाही बंदी आणली जाऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच जर गावात कुणी धमकी दिली तर त्याची प्रशासनाकडे तक्रार केली जाईल अशी माहिती मेघवाल यांनी दिली आहे.