नवापूर : केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याचे काम सुरु केले आहे. गोर-गरीब आदीवासी महिला व युवकांसाठी असंख्य योजना राबविल्या जात आहे व त्याची अमंलबजावणी पारदर्शतेने केली जात असल्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी भागात विकास होताना दिसत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.हीना गावीत यांनी केले. त्या खाडबारा येथे आदिवासी विकास विभागा तर्फे आयोजित ८० आदिवासी लाभार्थ्यांना डीझेलपंप वाटप कार्यक्रमात बोलत होत्या.
विरोधकांच्या खोट्या तक्रारीमुळे योजना बंद पडल्या
डॉ.हिना गावीत यांनी सांगितले की, विरोधकांकडून खोट्या तक्रारी केल्यामुळे आदिवासी बांधवाच्या योजना बंद पडल्या होत्या. आपण या बाबत दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटुन त्यांच्या लक्षात आणुन दिल्या नंतर आता पुन्हा गरिबांना लाभ मिळणार आहे. यावेळी आमदार विजय गावीत यांनी सांगितले की, आता आदिवासी विकास विभागाची सर्व योजना राबविली जाणार आहे. आम्ही काही देण्याच्या प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा विरोधकांनी अडथळे आणले. पंतप्रधान मोदींच्या सुचनेनंतर आदिवासी विकासाच्या योजना जोमाने राबविली जाणार आहे त्यासाठी लाभार्थ्याने अर्ज करावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापक किरण गाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, महीला आघाडी अध्यक्षा सविता जयस्वाल, डॉ.कांतीलाल टाटीया, एजाज शेख, प्रदीप वळवी, सुभाष गावीत, जाकीर पठाण, गोपीचंद जैन, राहुल वाडीले, रविंद्र पाटील तसेच परीसरातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.