नवापुर। तालुक्यातील अतीदुर्गम भागातील ग्रामपंचायत कारेघाट ता. नवापूर ला जिल्हा स्मार्ट म्हणून घोषित करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातून 585 ग्रामपंचायतीने सदर योजनेत भाग घेतला असता प्रथम तालुकास्तरावरील ग्रामपंचायत निवड करण्यात आली असता कारेघाट सर्वाधिक गुणासह अव्वल क्र वर होते. नंतर जिल्हास्तर तपासणीमध्ये स्पर्धेत एकूण 6 तालुक्यातील प्रथम आलेल्या 6 ग्रामपंचायत जिल्हा स्तरीयतपासणी समितीने तपासणी केली असता ग्रामपंचायत कारेघाट ता. नवापूर सर्वाधिक व मोठ्या फरकाने गुण मिळवून स्मार्ट जिल्हा ग्राम पुरस्काराने घोषित करण्यात आली.
सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना गौरविले
गावात विकासासाठी 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळविण्यात यश आले. 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधीकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी , पोलीस अधीक्षक श्री डहाळे यांच्या हस्ते पुरस्कार व 10 लाख धनादेश देऊन ग्रामपंचायत परमेश्वर विठोबा गंडे ग्रामसेवक, उपसरपंच दिलीप जीवल्या गावीत, सरपंच फत्तुबाई बुलजी गावीत यांना गौरविण्यात आले. ग्रामसेवक सोशल फाऊंडेशन व नवापूर ग्रामसेवक संघटना आणि कुशल प्रशासक नंदकुमार वाळेकर गटविकास अधिकारी पं.स नवापूर , किरण गावीत विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), दिलीप कुवर विस्तार अधिकारी (ग्रा.प.) यांचे मार्गदर्शन व उत्कृष्ट नियोजनातून आणि कुथ्याभाऊ गावीत आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त त्यांच्या अनुभवातून यश मिळविता आले असे ग्रामपंचायत सचिव परमेश्वर गंडे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत कारेघाट अती दुर्गम भागात आहे. गावातील तरुणसंघ, सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गट व ग्रामस्थ यांचे चांगले सहकार्य मिळाले. दिलीप जीवल्या गावीत उपसरपंच कारेघाट हे उच्च शिक्षित असल्याने त्यांचे खूप मोलाचे सहकार्य राहिले. तसेच ग्रामसेवक सोशल फाऊडेशनचे मोलाचे सहकार्य मिळाले. गावात कारेघाट पाणी प्रकल्प आम्ही राबविणार आहोत.
परमेश्वर गंडे, ग्रामसेवक
गावकरी , ग्रामपंचायत कार्यकारणी , बचत गट ,तरुण संघ, व तरुण ग्रामसेवक परमेश्वर गंडे यांची साथ मिळाली. व आम्ही आदर्श गावाचे स्वप्न पाहिले . सर्वाची चांगली साथ मिळाली व आम्हाला हे यश मिळविता आले. आम्ही शासनाच्या योजनेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त बक्षीस गावाला मिळवून देऊ.
दिलीप जीवल्या गावीत, उपसरपंच कारेघाट