स्वातंत्र्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे। अशी एकमेकांना साद घालत क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचे जोखड देशाच्या खांद्यावरून उतरवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, त्यात अनेकांना वीरमरण आले. देशाला गुलामीत ठेवणाऱया ब्रिटिशांची भारतातून हकालपट्टी करणे, हे क्रांतिकारकांचे एकमेव ध्येय होते. तरूण- तरूणी , वृद्ध सारे ब्रिटिशांविरूद्ध पेटून उठले. भारतावरील दिडशे वर्षांची गुलामी नष्ट करण्यासाठी सर्व झटत होते, प्रसंगी प्राण त्यागण्याची त्यांची तयारी होती. अशा थोर क्रांतिकारकांनामानवंदना! देश नेहमीच त्यांचा ऋणी राहिल. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली आहेत. तत्कालिन परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा राज्यकारभार हाती घेतला. काँग्रेसने देशात पंचवार्षिक योजना, औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देत सहकार चळवळ, लघुउद्योग, कुटिरोद्योग, दुग्ध उत्पादन, शेती , सुतगिरण्या, साखर कारखाने आदिंना सहकारातून उभे केले. देशातील सर्वसामान्य माणसाचा उत्कर्ष व्हावा , प्रत्येक माणूस स्वयंपूर्ण बनावा, असे धोरण त्यामागे होते. परंतु सहकार चळवळींतून सर्वसामान्य लोकांचा विकास न होता , ही चळवळ पुढाऱयांनी हातात घेतली. सहकारी चळवळीतून स्वाहाकार करण्याची आधाशी प्रवृत्ती राजकारण्यांनी बाळगली आणि जनतेच्या घामाचा पैसा सहजपणे लुटण्याची हातोटी काही पुढाऱयांनी अवगत केली. देशाला विनाशाकडे नेणारे हे भ्रष्टाचारी पुढारी अमाप दौलत, संपत्ती, स्थावर मालमत्ता कमवून गब्बर झाले. एवढे की, पुढच्या काही पिढ्या आरामात बसून खाऊ शकतील, अशी सोय त्यांनी आपापल्या कुटुंबांसाठी करून ठेवली. महात्मा गांधींचे नाव घेऊन राजकारण केले, परंतु महात्मा गांधी यांनी दिलेली शिकवण, ‘साधी राहणी, उच्च विचार सरणी’ अंमलात आणण्यास हे नतद्रष्ट पुढारी नाकाम झाले. यामुळेच देशातील सर्वसामान्य लोकांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होऊ लागले. जनतेपर्यंत सरकारच्या सार्वजनिक सेवां-सुविधां पोहोचण्यापूर्वी सरकारी बाबूंचे हात ओले करावे लागतात, अशी स्थिती आज आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु देशात सुराज्य आलेच नाही. छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत जगाला दाखवून दिले की, सर्वसामान्य नागरिकाला कसा सन्मान दिला जावा, त्याला थोडाही त्रास झाला तर शिवराय त्याची दखल घेत होते. परंतु आजच्या कार्पोरेट जमान्यात सर्वसामान्याचे ऐकतो कोण? सर्वसामान्य माणसाला एखाद्या नेत्याला भेटायचे असेल तर त्याचे चेले-चपाटे दलाल म्हणून मध्यस्थ असतात. सर्वसामान्य लोकांची कामे होणार केव्हा? काही ठिकाणी आपण पाहतो की, वर्षानुवर्षे सार्वजनिक कामे सुरू आहेत, परंतु ते काम वेळेत होते की नाही ते प्रशासन गांभीर्याने पहात नाही. असले दळभद्री प्रशासन व सरकारी बाबू काय फक्त वेतन घेण्याच्या कामाचे आहेत का? देशातील या भ्रष्ट व निष्क्रीय व्यवस्थेमुळे सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे. त्यात सत्ताधाऱयांनी वाढवलेली व्यापाऱयांच्या सोयीची महागाई , सर्वसामान्य माणसाला व सर्वसामान्य शेतकऱयाला मनमोकळेपणाने जगू देत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी-जास्त व्हायला हवेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. ते वस्तुस्थितीला धरून आहे.
अशोक सुतार- 8600316798
Prev Post