जळगाव। जिल्ह्यातील सर्व ज्ञात-अज्ञात स्वांतत्र्यसैनिकांनी आणि स्वांतत्र्यलढ्यांतील त्यांच्या योगदानाची माहिती असलेला ‘भारताचा स्वांतत्र्यलढा व जळगाव जिल्ह्यांचे योगदान’ हा संदर्भग्रंथ विवेकानंद बहुउद्देशिय मंडळातर्फे साकरण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यांतील भावी पिढीत देशभक्तीचा संस्कार वारशाच्या रूपाने रूजाव व राष्ट्र व समाजासाठीची त्यागप्रवृत्ती अधिक मजबूत व्हावी असा उदात्त हेतू यामागे असल्याचे श्री. सोनवणे यांनी सांगितले. मंडळातर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली अशी विचारणा केली असता श्री. सोनवणे यांनी सांगितले की, जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातून स्वांतत्र्यसैनिकांच्या नावांची यादी असलेली कोनशिला गायब होण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार माध्यमांनी व जबाबदार कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्यानंतर पूर्ववत बसविण्यात आली आहे. याप्रकारातूनच हा उपक्रम हाती घेतला असल्याचे श्री. सोनवणे म्हणाले. यापुस्तकात जिल्ह्यांतील स्वांतत्र्य सैनिकांचे योगदान, छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यांतील स्वांतत्र्य सैनिकांच्या आप्तस्वकीयांनी, नातेवाईकांनी स्वांतत्र्यसैनिकांबद्दल त्यांच्या जवळ असलेली माहिती, छायाचित्र आम्हाला 0257-2234455 यादूरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत संपर्क करून उपलब्ध करून दिल्यास संदर्भग्रंथ परिपूर्ण होण्यास मदत मिळेल असे श्री. सोनवणे यांनी सागितले आहे.