नवी दिल्ली : पती शहीद झाल्यानंतर भारतीय सैन्यात दाखल झालेल्या लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि लेफ्टनंट निधी दुबे या असामान्य वीरांगणा आहेत, अशा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात बोलताना केला. आजच्या 36व्या भागानंतर या कार्यक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली.मोदी म्हणाले, कर्नल संतोष महाडिक आणि नाईक मुकेश दुबे या भारताच्या सुपूत्रांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या वीरपत्नींनी देखील त्यांच्यासारखेच धाडस दाखवले असून अनेक अडचणींवर मात करीत दृढनिश्चय आणि देशभक्तीच्या जोरावर त्या भारतीय सैन्यदलात दाखल झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
विविधतेत एकता शक्तीचे भांडार
मोदी पुढे म्हणाले, विविधतेत एकता ही केवळ एक घोषणा नाही. तर, आपल्यातील मोठ्या शक्तीचे भांडार आहे. एक भारत-श्रेष्ठ भारतचे स्वप्न यामध्ये सामावले आहे. तुम्ही कधी भारतातील या विविधतेला अनुभवले आहे का? हा अनुभव तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. तो तुम्हाला बरेच काही शिकवेल, असे मोदी यांनी तरूणांना उद्देशून म्हटले.
बिलाल दारचाही गौरव
स्वच्छ भारत संबंधी मोदी म्हणाले, ही आता चळवळ झाली आहे. त्यामुळे शहर-ग्रामीण भागातील ज्येष्ठ, तरुण, पुरुष, महिला अशा प्रत्येकाने या मोहिमेचा भाग व्हावे. आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणार्यांवर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला पाहिजे. आता कोणी सार्वजनिक ठिकाणी कचरा करत असेल तर लोक त्याला विरोध करू लागले आहेत. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम आता संकल्प से सिद्धीपर्यंत पोहोचल्याचे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर पालिकेने स्वच्छता अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनवलेल्या बिलाल दार या तरुणाचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. बिलाल हा मुलगा येथील प्रसिध्द दल सरोवरात साठलेला कचरा काढण्याचे काम करतो. वर्षभरात तो या सरोवरातील 12 हजार किलो कचरा काढून पाण्याचा स्त्रोत स्वच्छ ठेवतो. या तरुणाच्या कामाची पालिकेने स्वच्छता मोहिमेत दखल घेतल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. बिलाल गेल्या 5 ते 6 वर्षांपासून म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षांपासून स्वच्छतेसाठी कार्यरत आहे.
पर्यटनस्थळांना भेट द्या
पर्यटनाबाबत मोदी म्हणाले, लोकांनी केवळ भेट देण्यासाठी म्हणून पर्यटनस्थळांकडे न पाहता अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला हवे. मी देशातील 500 जिल्ह्यांना भेटी दिल्या, त्यांचा अभ्यास केला. त्यामुळे पंतप्रधानपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर त्याचा मला खूपच फायदा झाला. त्याचबरोबर लोकांनी केवळ बदल म्हणून फिरायला जाऊ नये. उलट लोकांनी त्यांचे अनुभव, छायाचित्रे यांची माहिती द्यावी. प्रत्येकाने आपल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट सात पर्यटनस्थळांची यादी तयार करावी, आणि शक्य झाल्यास त्या ठिकाणांना भेटी द्याव्यात, असेही मोदी म्हणाले.