मुंबई : वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्येनंतर पुरावे नष्ट केल्याचा आरोप करत, कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर, भायखळा कारागृहातील डॉ. खान, अधीक्षक चंद्रमणी इंदूलकर यांच्यासह सहा जणांच्या नार्को, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर अशा वैद्यकीय चाचण्या करण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारा अर्ज मरियम शेख या कैदी महिलेने आपल्या वकीलांमार्फत दंडाधिकारी न्यायालयात केला. मंजुळा हत्येनंतर मरिअमच्याच तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी कारागृहातील सहा अधिकारी महिलांविरोधात गुन्हा नोंदवला होता. या अर्जावर न्यायालयाने तपास अधिकारी प्रभा राऊळ यांना आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देत सुनावणी 14 जुलैपर्यंत तहकूब केली.
मंजुळावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार?
मंजुळा हत्येच्या गुन्ह्यात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, कट रचून हत्या, पुरावे नष्ट करणे यासह अन्य कलमांचा समावेश करावा, अशीही मागणी करण्यात आली.अशाच प्रकारचा आणखी एक अर्ज ठाणे कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांनी मंगळवारी आयुक्त पडसलगीकर यांच्याकडे केला. जाधव यांनी पुरावे नष्ट करणार्या साठे, इंदूलकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या सूचना नागपाडा पोलिसांना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह नियमांनुसार मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा कारागृहातच होणे आवश्यक आहे. अधीक्षकाच्या स्वाक्षरी नंतरच मृतदेह बाहेर काढला जातो. मंजुळाला मारहाण घडली तेव्हा कारागृहाल शिट्टी, अलार्म वाजला नाही, हे संशयास्पद आहे. दोन्ही अर्जामध्ये साठे यांनी पुरावे नष्ट केले, मंजुळा हत्येला त्यांचा पाठिंबा होता असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, जाधव यांचा अर्ज आयुक्तांनी गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना यांच्याकडे धाडला. सक्सेना यांनी हा अर्ज स्वीकारला.