स्वाभिमानीचा सरकारशी काडीमोड!

0

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडल्याची घोषणा बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात केली. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आणि स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी यापुढे लढा चालूच राहील, असेही त्यांनी सांगितले. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे चार सप्टेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून वस्त्रोद्योग महामंडळाची गाडी आजच जमा करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

हमीभावाचे आश्‍वासन पाळले नाही
पत्रकारांशी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले की, ज्या उद्देशाने राजकारणात आलो तो उद्देश साध्य होत नसताना या ठिकाणी थांबणे योग्य नाही. तीनसाडेतीन वर्षे थांबलो. मोदींनी हमीभावाचे आश्‍वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले. ज्याला सत्तेत पाठवले तोच आम्हाला आमचा म्हणत नाही. यापुढे केंद्र आणि राज्य सरकारशी आमचा संबंध असणार नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. आज घेतलेल्या निर्णयामुळे होणार्‍या राजकीय फायदा तोट्याचा मी विचार करीत नाही. शेतकर्‍याच्या चळवळीसाठी वाट्टेल ते करायला तयार आहे, असेही शेट्टी म्हणाले.

राज्य सरकारची ऑफर धुडकावली
राजू शेट्टी यांनी रालोआमध्ये राहण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना आणखी एक मंत्रिपद देण्यात येईल, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे केले होते. मात्र, त्यांची ही ऑफर शेट्टी यांनी धुडकावून लावल्याचे आजच्या त्यांच्या घोषणेनंतर स्पष्ट झाले. सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करून न थांबता शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संबंध तुटला असल्याचे सांगितले होते. खोत हे स्वाभिमानीचे प्रतिनिधी नसल्याने सरकारमधून त्यांची हकालपट्टी व्हावी, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली होती. सत्ताधार्‍यांवर दबाव वाढवत शेट्टी यांनी रालोआतून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. शेवटी बुधवारी शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबतची अधिकृत घोषणा केली.