’स्वाभिमानी’ महाशय खुर्चीवर बसून पेपर वाचत होते. चिरंजीव शेजारीच बसलेले होते. खुर्ची हलत होती. तेवढ्यात धप्प आवाज आला.. मम्मी पप्पा पडले, चिरंजीव ओरडले.
’अरे निवडणुकीआधी कसे पडले?’ आतून आवाज आला.
’पप्पा आतापासूनच तयारी करताय का?’ चिरंजीवांनी हसत हसत विचारले.
महाशय रागारागात उठले.. थोडे चिंताग्रस्त चेहर्याने त्यांनी मोबाइल घेतला व थोडा विचार करून त्यांनी अभ्यासू प्रमुखांना फोन लावला..पण प्रमुखांनी उत्तर दिले नाही. दोन तीन वेळेस ट्राय केला तेव्हाही फोन न लागल्याने त्यांनी धाडकन फोन आपटला. आता त्यांनी थेट गुजरात दरबारी फोन लावला.
‘कृपया चुनाव के बाद कॉल किजिए’ तिकडनं कस्टमर केअरच उत्तर आलं.
महाशय मात्र जाम तापले, ते कासावीस झाले. त्यांनी मोबाइल घेतला व थेट बारामतीच्या साहेबांना फोन लावला. साहेबांनीही फोन उचलला नाही. अस्वस्थता अजून वाढली. एक बेल जायची आणि फोन कट व्हायचा..
पोटनिवडणुकीत गणित जुळवणं थोडं कठीण जाणार आहे. या चिंतेने महाशय सतत कासावीस होत होते. त्याआधी पद मिळावे, अशी त्यांची इच्छा होती.
काय करावे ते सतत विचार करत होते. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. त्यांनी लागलीच फोन उचलला. मात्र, समोरून पुन्हा कस्टमर केअरच…. कस्टमर केअरकडून महाशयांना मोठ्या जॉबची ऑफर आली होती. मात्र, त्यांनी संतापून फोन फेकला. त्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यासू प्रमुखांना फोन लावला. मात्र, पुन्हा एक बेल वाजून फोन बंद झाला. आता मात्र महाशय थकले.
अभ्यासू प्रमुखांनी इकडे बैठक बोलावली. खड्डेमुक्तीचे जनक, जळगावचे आरोग्यदूत व भाऊ या दोघांसह सर्व हजर होते. प्रमुखांनी सुरुवात खड्ड्यांपासून केली. ‘15 तारखेपर्यंत खड्डे बुजणार आहोत का आपण?’
’आपण कसे बुजवणार ते तर कामगार बुजवतील.. आणि नाही बुजवले तरी कोण काय उखा…
‘ओ काही काय बोलताय’…आरोग्यदूत म्हणवल्या जाणार्यांना प्रमुखांनी शांत केलं.
’हल्ली वादग्रस्त बोलून पब्लिसिटी मिळवण्याची माझी सवय त्यांना लागलेली दिसतेय’ जळगावच्या भाऊंनी मध्येच टोमणा मारला.
खड्डेमुक्तीचे जनक मात्र शांतच होते… ते मोबाइल चेक करत होते..
‘खड्ड्यांची परिस्थिती काय?’ प्रमुखांनी विचारणा केली व ते जागे झाले
‘अहो सेल्फी खूप येताय खड्ड्यांसोबत, आता खड्डे कमी आणि सेल्फी जास्त अशी परिस्थिती आहे… 15 पर्यंत लोकांना कशी उत्तरे द्यायची ते समजत नाहीय’.
‘ओके काळजी करू नका बघू आपण काय ते.. प्रमुखांनीच त्यांना सावरलं..
स्वाभिमानीच काय करायच..? प्रमुखांनी विचारणा केली..
‘ते रावसाहेब ठरवतील, आपण ते असल्यावरच चर्चा करू’.
भाऊंनी रागारागात चर्चा थांबवली. अर्धा तास गुप्त चर्चा झाली…
इकडे ‘स्वाभिमानी’ महाशयांची झोप झाली. पोटनिवडणुकीला हप्ता बाकी होता.. त्यांनी पुन्हा फोन लावला फोन पुन्हा कट झाला… आता करायच काय त्यांनी.. चिरंजीवाला बोलावून फोन लावायला सांगितला.
चिरंजीव आश्चर्यचकित झाले.. ‘अहो पप्पा तुम्हाला ब्लॉक केलंय त्यांनी….’ चिरंजीवांनी कारण सांगितलं.
महाशयांचे डोळे रागाने लालबुंद झाले..दुसर्या दिवशी सकाळी सकाळीच महाशयांना अभ्यासू प्रमुखांचा फोन आला. महाशयांनी देवाकडे पाहत. ‘देव पावला देव पावला’ म्हणत फोन उचलला व रागात काही बोलणार तोच समोरून अभ्यासू प्रमुखांनी बोलायला सुरुवात करत मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी दिली. ‘त्यात तुम्हाला स्थान दिल जाणार असून, उद्याच शपथविधी आहे’. अस सांगितलं. महाशयांचा आनंद गगनात मावत नव्हता.. घरात दिवाळी सुरू झाली. ‘पप्पा पण खातं कुठलं’.. चिरंजीवांनी विचारणा केली. ‘कुठलही असो’… महाशयांनीही प्रश्नातच उत्तर दिलं.शपथविधी झाला.. सर्व मीडिया जमली व मीडियासमोर अभ्यासू प्रमुखांनी खात्याची घोषणा केली.. महाशयांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले… प्रमुखांनी तिथून काढता पाय घेतला. मीडिया मात्र ‘स्वाभिमानी’ महाशयांवर खड्डेमुक्तींच्या घोषणेने तुटून पडली. मीडियाला आवरता आवरता महाशयांना घाम फुटला.. ‘अरे देवा घरीच बरा होता..’ असा विचार करत ते कसेबसे सुटले.. इकडे खड्डेमुक्तीचे जनक मात्र गालातल्या गालात हसत होते. पोटनिवडणुक अजून व्हायचीच होती.. त्याआधीच खड्ड्यांनी महाशयांना हैराण केल होतं… पोटनिवडणुकीचे गणित अजूनही जुळले नव्हते.. त्या चिंतेतच पुन्हा फोन आला व कस्टमर केअरकडून पुन्हा जॉबची ऑफर आली.. महाशयांनी तो फोन बंद न करता. सॅलरीसह डॉयक्युमेंट काय लागतील याची अगदी हळू आवाजात विचारणा केली.