लोणावळा : स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे आणि त्यांचा पुतण्या किरण रतन साळवे यांची मावळ तालुक्यातून 5 एप्रिल ते 28 एप्रिल 2017 असे एकूण 24 दिवसांसाठी हद्दपारी करण्यात आली आहे. तसे आदेश मावळचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी 3 एप्रिल रोजी पारित केले आहे.
कार्यकर्त्यांसोबत शिवीगाळ आणि हाणामारी
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कारणाने 28 एप्रिल रोजी ओळकाईवाडी येथे रमेश साळवे यांची शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य गबळु ठोंबरे आणि इतर सेना कार्यकर्त्यांसोबत शिवीगाळ आणि हाणामारी झाली होती. त्यापार्श्वभूमीवर कुसगाव ओळकाईवाडी हद्दीमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण होऊन भांडण तंटा वाढण्याची शक्यता आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह असल्याने लोणावळा ग्रामीणचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.संदीप येडे पाटील यांनी सदर हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
हजर न राहिल्याने कारवाई
या प्रस्तावावर 24 मार्च रोजी पहिल्यांदा सुनावणी झाली. त्यावेळी रमेश साळवी आणि किरण साळवी यांनी त्यांचे म्हणणे लेखी मांडण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार 30 मार्च ही तारीख देण्यात आली. मात्र त्या दिवशी योग्य ती कागदपत्रे सादर करता स्वतःही हजर न राहिल्याने प्रांताधिकारी भागडे यांनी रमेश साळवे आणि किरण साळवे यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली.