स्वाभिमानी लवकरच सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत!

0

मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून उठलेल्या वादंगानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेपासून अलिप्त होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते रविकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा खा. राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केल्याने भाजपा आणि स्वाभिमानी मधील दरी आणखी वाढली आहे. खा. शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्तेतून बाहेर पडा!
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाजपा जवळकीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. कृषी राज्यमंत्री खोत यांनी थेट खा. शेट्टी यांनाच आव्हान दिल्याने खा. शेट्टींनी सरकार विरोधात एल्गार पुकारत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. खा. शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या अद्यक्षपदाचा राजीनामा खा. शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांनी शेट्टी यांच्याकडे सत्तेतून बाहेर पडण्याबाबत चर्चा केल्याची देखील माहिती आहे.

ना. खोतांच्या भूमिकेकडे लक्ष
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीला खा. शेट्टी यांनी विरोध केल्यानंतर खा. शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये असणारी कुरबुरीत वाढ झाली आहे. पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत खोत यांच्या बद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी पाढा वाचला होता. त्यामुळे या तक्रारींबाबत खोत यांनी येत्या 4 जुलैपर्यंत आपली बाजू मांडावी, असा अल्टिमेटम खा. शेट्टी यांनी देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आता तुपकर यांच्या राजिनाम्यानंतर कृषी राज्यमंत्री खोत हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.