शहादा । तालुक्यातील लोणखेडा येथे सकाळी 11 वाजेपासुन शेतकरी स्वाभीमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे कारखाना परिसरात उसांचा गाड्याची रांग पहावयास मिळाली प्रकाशा ता शहादा येथे शेतकरी स्वाभीमानी संघटनेची उस परिषद या गळीत हंगामासाठी मिटींग आयोजीत करण्यात आली होती. यात विविध विषयावर चर्चा करण्यात आली व शेतकर्यांचा उसाला चालु हंगामाला 3200 रुपये प्रती टन देण्यात यावा उसाला पहिली उचल 3000 रुपये मिळावी , वजन काट्यात चोरी होत असल्याने चोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलावी व झोन बंदी किंवा राज्यबंदी आम्हाला मान्य नाही व उसाला जास्तीत जास्त भाव देइल त्या कारखान्याला उस देण्यास परवानगी देण्यात यावी. याप्रमाणे ठराव पारीत करण्यात आले. उसाला जोपर्यंत 3200 रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत कारखाना सुरु होऊ देणार नाही किंवा कारखाना चालु देणार नाही अश्या आश्ययाचा ठराव पारीत करुन जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शेतकरी स्वाभीमानी संघटना रस्त्यावर उतरेल.
सातपुडा कारखानातर्फे 2200 भाव
शेतकरी स्वाभीमानी संघटनेचे कार्यकर्ते आज 11 वाजेपासुन रस्त्यावर उतरले होते. सातपुडा साखर कारखान्याने 2200 रुपये हमी भाव दिला आहे. तो 3200 रुपये करण्यासाठी शेतकरी स्वाभीभानी सघटना यानी रास्ता रोको आंदोलन केले आहे. कारखान्यांपासून ऊस ट्र्क व बैलगाडी यांची मोठी रांग लागली आहे. आंदोलनात शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी , नथु रोहिदास पाटील , उपजिल्हाध्यक्ष वसंत सखाराम पाटील शहादा तालुका अध्यक्ष, रत्नदिप पाटील, उपतालुका अध्यक्ष, डॉ.ऋषिकेश पाटील ,मुकुंद चौधरी, घनश्याम पाटील, प्रवीण पाटील, रविंद्र पाटील सहभागी होते.
ऊसतोड बंद ठेवली
आंदोलनाला प्रांताअधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी भेट देऊन प्रांतांनी कारखान्याचे एम. डी. व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकार्यांनी उद्या 1 वाजता स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकार्यांना नंदुरबार येथे बोलविले आहे. दै. जनशक्तीशी बोलतांना स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनशाम चौधरी म्हणाले की, जर उद्या नंदुरबार येथे तिढा सुटला नाही तर कार्यकर्ते तीव्र आदोलन करतील. उसाची वाहन जाळपोळ करण्यासही कार्यकर्ते मागेपुढे पहाणार नाहीत. परीसरातील शेतकर्यांनी ऊसाची तोड बंद ठेवली आहे. असे सांगितले.