स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांचा उपोषणादरम्यान मृत्यू

0

ऋषिकेश : गंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या मागणीसाठी २२ जूनपासून उपोषणास बसलेले पर्यावरणवादी प्रा. जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

स्वामी सानंद यांची प्रकुर्ती बिघडल्याने त्यांना बुधवारी हरिद्वार येथून एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामी सानंद यांनी १११ दिवस उपोषण केले. यादरम्यान पाण्यात मध मिसळून केवळ त्याचे सेवन ते करत होते. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी पाणीही त्यागले होते. कानपूर आयआयटीमध्ये स्वामी सानंद प्राध्यापक होते. त्यानंतर केंद्रिय पर्यावरण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. सध्या एका सन्याशाचे जीवन ते जगत होते.

अवैध रेती उपसा, बंधारे, बेसुमार प्रदूषण या जोखाडातून गंगेला मुक्त करावे, या मागणीसाठी स्वामी सानंद उपोषणाला बसले होते. ‘गंगा बचाव’साठी विविध मुद्द्यांवर स्वामी सानंद यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून त्यांनी गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा बनवण्याची मागणी केली होती. त्या पत्रावर कोणतंही उत्तर न मिळाल्याने स्वामी सानंद २२ जूनपासून उपोषण करण्यास बसले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी स्वामी सानंद यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती मात्र त्यांनी ती विनंती धुडकावली होती. स्वामी सानंद यांनी २०१२ मध्येही गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी उपोषण केले होते. नंतर सरकारने मागण्या मान्य केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले होते.