फैजपूर । लक्ष्मीनगरातील स्वामी नारायण मंदिरातील भगवान स्वामी नारायण, लक्ष्मी नारायण, राधा, कृष्ण, हनुमान, गणपती, रामदरबार व विठ्ठल रुखमाई यांच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार ९ रोजीपासून श्रीमद् भागवत गीता, श्रीहरी गीता व कीर्तन महात्म्य या त्रिदिनात्मक विविध ग्रंथ पारायण तसेच सुवर्णांलकृत सिंहासन व चरणारविंद छत्री उद्घाटनासह शास्त्री धर्मप्रसाद यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असा कार्यक्रम करण्यात येत आहे. ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत विविध ग्रंथांवर संगीतमय कथेचे वक्ते म्हणून वेदांत व्याकरणाचार्य शास्त्री भक्तिप्रकाशदास आहे.
धर्मप्रसाददास यांचा सहस्त्रचंद्रदर्शन पुजाविधी
सुवर्णांलंकृत सिंहासनाचे व चरणारविंदाचे छत्राचे उद्घाटन स.गु. शास्त्री धर्मप्रसाददास महामंडलेश्वर जनार्दन महाराज, गोपाल चैतन्यदास महाराज यांच्या हस्ते होईल. तीनदिवसीय कार्यक्रमात दररोज सकाळी 8 वाजता पोथी यात्रा, ८.३० ते ११ श्रीमद् भागवत गीता व्याख्यान, दुपारी ३ ते ६ शिक्षापत्री विवेचन, १० रोजी सकाळी ७.३० वाजता पाटोत्सव, ८.१५ ते ११.३० श्रीहरी गीता व्याख्यान, दुपारी ३ ते ६ कीर्तन, महात्म्य कथा तर शनिवार ११ रोजी धर्मप्रसाददास यांचा ब्राह्मणांद्वारे विधीवत सहस्त्रचंद्रदर्शन पुजाविधी, दुपारी 1 वाजता महाप्रसाद असा विविधांगी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला विविध संत महात्म्यांची उपस्थिती लाभणार आहे.