स्वामी विवेकानंदांचे विचार आयुष्याला कलाटणी देणारे

0

पुणे । आपल्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका अतिशय महत्वाची असते. आपण सर्वोत्तम व्हावे, अशी अपेक्षा ठेवणारे आई-वडिलांनंतर शिक्षकच असतात. स्वामी विवेकानंदांचा एकेक विचार आयुष्याला कलाटणी देणारा आहे. तशा विचारांचे आणि आयुष्याला घडविणारे शिक्षक आपल्याला कायम लाभावेत, अशी भावना भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.

लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 आणि पुणे विद्यार्थी गृहातर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षकांच्या गौरव सोहळ्यात गायकवाड बोलत होते. सहकारनगर येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी, उप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिरगे, कुलसचिव सुनील रेडेकर, रवींद्र सातपुते, आयोजक प्रकाश नारके, सहआयोजक आनंद आंबेकर, शरद पवार, राजेंद्र गोयल, दिलीप निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या आयुष्याला घडविणारी प्रत्येक व्यक्ती शिक्षक असतो. आपले मन देखील आपला गुरू असतो. शिष्याच्या यशातच शिक्षकाचे यश असते. आजही समाजात असे आदर्श शिक्षक आहेत, ही आपल्या सर्वांसाठी चांगली बाब आहे, असे गिरीश मालपाणी यांनी यावेळी सांगितले. विलास चाफेकर, डॉ. शेखर कुलकर्णी, ओमप्रकाश पेठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाश नारके यांनी प्रास्ताविकात या गौरव सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सरिता सोनावळे आणि गंधाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप निकम यांनी आभार मानले.

पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक
आयुष्यात रोज नवी आव्हाने येत असतात. त्याच्याशी झटून पुढे जायचे असते. ही झुंज देण्यासाठीची प्रेरणा आपल्याला शिक्षकांकडून मिळत असते. आज सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांना सामोरे जात जागतिक पातळीवरील संधी ओळखून पुढे गेले पाहिजे. त्यासाठी पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. प्रयोगशील शिक्षकांनी त्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक प्रसंगातून आपण नवीन काहीतरी शिकत असतो. अनुभव आपला एक महत्वाचा शिक्षक असतो. त्यातून आपण समृद्ध होत जातो, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

35 शिक्षकांचा सत्कार
डॉ. सुधाकर जाधवर, मधुसूदन देसाई, सुजाता शेणई, सुचित्रा दाते, प्रवीण ओझा, लीना वर्तक, कोमल ठक्कर, पूर्वा म्हाळगी, डॉ. सुवर्णा बिडवे यांच्यासह एकूण 35 शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या वंचित विकास आणि आस्था या संस्थांचा विशेष गौरव करण्यात आला. वंचित विकासाच्या वतीने विलास चाफेकर यांनी, तर आस्थाच्या वतीने डॉ. शेखर कुलकर्णी यांनी सन्मान स्वीकारला.