पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी येथील स्वामी समर्थ बिल्डरला फ्लॅटधारकाला एकूण 2 लाख 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवृत्त जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष दिनकर कांबळे, सदस्य आर.जी खोडवे आणि आर.एल. चव्हाण यांनी हा आदेश दिला आहे.
किरकिटवाडी भागात स्वामी समर्थ बांधकाम व्यावसायिकाच्या
समर्थ विहार हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये प्रमोद निवृत्ती कुदळे यांनी 2010मध्ये एक फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी कुदळे यांनी प्रारंभी 50 हजार रुपये धनादेशाद्वारे दिले आणि उर्वरित रक्कम हप्त्याने असे एकूण 2 लाख 50 हजार रुपये दिले. परंतु तीन वर्षांनंतरही फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने कुदळे यांनी अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीकडे तक्रार केली तसेच स्वामी समर्थ असोसिएटचे संग्राम तुकाराम दांगट व पार्टनर यांच्या विरोधात स्थायी लोकअदालत येथे तक्रारही दाखल केली. त्यानुसार व्यावसायिकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. अॅड महेंद्र दलालकर यांनी कुदळे यांच्या वतीने काम पाहिले.