सामाजिक कामाने मिळतो नावलौकिक आणि आनंद स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत निर्मला जगताप (वय 57) पिंपरी-चिंचवडच्या सामजिक क्षेत्रातील रणरागिणीच बनल्या आहेत. कौटुंबिक जबाबदार्या सांभाळताना बाईनं घराबाहेर पडून बाहेरचं जग पाहिलंच पाहिजे, असं त्या सांगतात.
स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान स्थापना
जगताप सामान्य कुटुंबातल्या. शिक्षण दहावीपयर्र्ंत. अहमदनगर जिल्ह्यात त्यांचे माहेर. गेली 30 वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक आहेत. विवाहानंतर मुंबईला स्थायिक असताना त्यांनी दुकानात नोकरी केली. कालांतराने पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर त्यांनी कित्येक वर्षे ब्युटीपार्लरचा व्यवसाय केला, साड्यांना पिको-फॉल करून द्यायच्या. याच काळात राजकीय क्षेत्रातही काम करू लागल्याने त्यांचा जनसंपर्क वाढला. त्यांनी महिलांना एकत्र करून छोट्या व्यवयासायांची प्रशिक्षणे दिली, स्वतः दुचाकी-चारचाकी चालवायला शिकून महिलांनाही त्यांनी दुचाकी चालवायला शिकवली. उत्तरोत्तर सामाजिक कार्याची आवडही वाढत गेल्याने त्यांनी राजकीय क्षेत्र सोडून स्वतःचे काहीतरी कार्य करायचे ठरवले आणि 2008मध्ये स्थापना केली. ‘स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान’ची.
बचत गटांची स्थापना; हेल्मेटबाबत जागृती
प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य अधिक बहरले. त्यांनी बचत गटांची स्थापना करून महिलांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले, गुटख्याची होळी. मकर संक्रांतीला चौकामध्ये वाहनचालकांना तिळगूळ देऊन हेल्मेट घालण्याबाबत जागृती, बांधकाम मजुरांचा-कष्टकर्यांचा सत्कार व त्यांच्यासाठी आरोग्यविषयक जागृती शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण शिबिर, वंचित घटकांतील मुलांना खाऊ वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन असे समाजोपयोगी उपक्रम जगताप सातत्याने राबवत आहेत. चिंचवड पोलिस स्टेशन दक्षता समिती, पोलिस मित्र संघटना, वाहतूक सल्लागार समिती, पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड प्रवासी संघटना, एमएसएस हायस्कूल शालेय परिवहन समिती या समित्यांमध्ये जगताप सक्रिय आहेत.
समाजकार्य अखंडपणे सुरू
या वाटचालीत अनेकांनी त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला, महिलांची चांगली साथ मिळाली नाही पण येतील त्यांच्या सोबतीने जगताप यांनी आपले समाजकार्य अखंडपणे सुरू ठेवले. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी त्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. त्यांच्या दोन्ही कन्या उच्चशिक्षित आहेत.
स्वतःच पुढे गेले
जगताप म्हणतात, माझ्या सामाजिक कार्याला अनेकांनी नावे ठेवली. पण मी स्वतःच पुढे गेले. सामाजिक कामाने मला नावलौकिक आणि आनंद दिला आहे.
– संध्या टोमके, पुणे