स्वारगेट एस.टी. डेपोप्रमाणेच वल्लभनगर डेपो होणार अत्याधुनिक!

0

अत्याधुनिकीकरण झाली चर्चा

पिंपरी : पुणे शहरातील केंद्रस्थान असलेल्या एस. टी. महामंडळाच्या स्वारगेट डेपो जसा आधुनिक आणि सर्व सोयींयुक्त असे आगर आहे. येथे येणार्‍या नागरिकांना, प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागत नाही. अत्याधुनिक सोयी, संगणकीकरण आदी सर्वच बाबतीत अग्रेसर ठरणार्‍या या आगाराचा आदर्श अनेक ठिकाणी घेतला गेला पाहिजे. पुण्यातील या आगराप्रमाणेच आता वल्लभनगर एस.टी. स्थानकाचे अत्याधुनिकीकरण करण्याच्या सूचना महापालिकेने मेट्रोला केली आहे. महापालिका प्रशासन आणि मेट्रो यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कर्मचार्‍यांसाठी उत्तम विश्रांती कक्ष
महापालिकेने या बैठकीमध्ये सांगितले की, वल्लभनगर एस. टी. स्थानक अत्याधुनिक प्रक्रारचे असले पाहिजे. प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या हॉटेल, बँक, एटीएम अशा सुविधा हव्या. प्रवाशांच्या सोयीसाठी त्याअंतर्गत पीएमपी, रिक्षा, मेट्रो थांबे हवे, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असावी, आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. बसचालक आणि वाहकांसाठी उत्तम प्रकारचा विश्रांती कक्षही बांधता येईल. बसस्थानकाचे आधुनिकीकरण करताना त्याठिकाणी 12 ते 15 मजली इमारत उभारल्यास त्यातून मेट्रोला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते. प्रवाशांसाठी मॉडर्न पद्धतीचे स्थानक बनविणे गरजेचे आहे. सद्यःस्थिती वल्लभनगर बसस्थानकाचा वापर सध्या फक्त एसटी बसेससाठी करण्यात येत आहे. या ठिकाणी बसच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र डेपो कार्यरत आहे. बसस्थानकावरून राज्यातल्या विविध शहरांसाठी बस सुटतात. एसटी महामंडळाने या स्थानकाच्या आधुनिकीकरण करण्याचा विचार आतापर्यंत केलेला नाही. बस स्थानकाच्या बाहेरून मेट्रो जाणार असल्यामुळे महामेट्रोला या स्थानकाचा कायापालट करून ते अत्याधुनिक करणे शक्य आहे.

प्रवाशांना मिळणार सर्व सुविधा
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, सध्या जमाना खूप प्रगत झाला आहे. ट्रेन, विमान येथे खूप अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी वापरतात. हिच टेक्नोलॉजी वापरून जर एस.टी. ला फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे. स्थानकाचे आधुनिकीकरण झाल्यानंतर प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळणे शक्य होणार आहे. नाशिक फाटा परिसरात रेल्वे स्थानक आहे. मेट्रोदेखील येथून जाणार आहे. पीएमपी आणि रिक्षाची वाहतूक इथून नियमितपणे होत असते. त्यामुळे हा भाग ‘मल्टिमोडल हब’ म्हणून विकसित होणे शक्य आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये ‘हब’चा समावेश करण्यात आला आहे.