स्वारगेट-कात्रज मेट्रोबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

0

पिंपरी-चिंचवड । पुणे शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग कात्रजपर्यंत पुढे नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा डिपीआर बनविण्यासाठी 30 लाख रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी पालिकेने दर्शविली आहे. या दरम्यान स्वारगेट ते कात्रज मेट्रोस मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे तापकीर यांनी सांगितले.

मेट्रो कात्रजपर्यंत नेण्याची मागणी
मेट्रो प्रकल्पाचा डिपीआर (सर्वंकष प्रकल्प अहवाल) दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) 2009 साली तयार केला आहे. त्यानुसार मेट्रोच्या चार मार्गाची लांबी 75.5 कि. मी. असून ते 2014-15 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. पण आता कुठे महामेट्रोच्या माध्यमातून स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रोच्या मार्गामधील काही भागाचे काम सुरू झाले आहे. पुणे महापालिकेने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली. त्याचवेळी स्वारगेटपर्यंत आलेली मेट्रो ही कात्रजपर्यंत पुढे नेण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.

पहिल्या टप्प्यातच धावण्याची शक्यता
पुणे-सातारा रस्त्यावरील फसलेला बीआरटी रस्ता, वाहनांची वाढती वाहतूक व त्यामुळे होणारी नित्याची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकासह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार भिमराव तापकीर सुरुवातीपासून पाठपुरावा करत आहेत. मुखमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याने आता पहील्या टप्यातील मेट्रो मार्गाबरोबर कात्रजपर्यंत मेट्रो धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.