सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेर्याचा वापर
लवकरच सविस्तर अहवाल तयार करणार
पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाच्या सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी शनिवारपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. महामेट्रोने यापूर्वी चिंचवड-निगडी आणि नाशिक फाटा-चाकण मेट्रोमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी स्वारगेट मेट्रोमार्ग कात्रजपर्यंत तर चिंचवड मेट्रोमार्ग निगडीपर्यंत वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर हे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
दोन्ही महापालिकांचे सहकार्य!
दोन्ही मार्गाच्या विस्तारीकरणाच्या मागणीनंतर पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने अहवालाची मागणी महामेट्रोकडे केली होती. या दोन्ही महापालिकांच्या निर्देशानुसार हा अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाबाबत महामेट्रोचे मुख्य अभियंता गौतम बिर्हाडे यांनी सांगितले की, सर्वेक्षणासाठी आम्ही ड्रोन कॅमेर्यांची मदत घेत आहोत. प्राथमिक सर्वेक्षण झाल्यानंतर महामेट्रो सविस्तर अहवाल तयार करणार आहे. पिंपरी-चिंचवड-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मेट्रोमार्गाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. दोन्ही महापालिकांनी या मार्गांच्या विस्तारीकरणास संमती दर्शविली असून, सविस्तर प्रकल्प अहवालासाठी निधी देण्याचेही मान्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर महामेट्रो स्वत: वनाज ते रामवाडी मार्गाचे चांदणीचौकापर्यंत विस्तारीकरण करणार आहे.
कर्वेरोडचे काम करणे सर्वात अवघड
बिर्हाडे यांनी सांगितले की, कर्वेरोडवरील मेट्रोचे काम 7 एप्रिलपासून सुरू झाले आहे. यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. येथील काम सर्वात अडचणीचे आहे. कारण हा भाग अरूंद असून, वाहतूक मोठ्याप्रमाणात असते. हे काम मध्यभागी 9 मीटरच्या भागात सुरू राहणार असून, वाहतुकीसाठी 7-7.5 मीटर जागा सोडण्यात आली आहे. अवजड वाहतूक अन्यठिकाणाहून वळविण्याची विनंती महामेट्रोने वाहतूक पोलिसांना केली आहे. एसटी महामंडळानेही त्यांच्या गाड्यांचे मार्ग बदलण्याचे आश्वासन दिले आहे. खासगी अवजड वाहनांना कर्वेरोडचा वापर करू दिला जाणार नाही, असे वाहतूक पोलिसांनीही म्हटले आहे.