महामेट्रोकडून मार्च अखेरीस पालिकेला प्रकल्प अहवाल सादर करणार
पुणे : स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्गाबद्दल ताणलेली उत्सुकता मार्च महिन्याच्या अखेरीस निकालात निघणार आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट-डीपीआर) येत्या दोन महिन्यात महामेट्रोकडून महापालिकेला सादर होणार आहेत. या मेट्रो मार्गासाठी सातारा रस्त्याने भुयारी मेट्रो अथवा स्वारगेट-मुकुंदनगर-गंगाधाम-गोकुळनगरमार्ग कात्रज चौक (एलिव्हेटेड) आणि स्वारगेट-मुकुंदनगर-बिबवेवाडीमार्ग कात्रज (एलिव्हेटेड), असे तीन पर्याय नजरेसमोर असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.
पिंपरी, चिंचवड-स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेने स्वारगेट ते कात्रजदरम्यानचा मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्यास महामेट्रोला दोन महिन्यांपूर्वी सांगितले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानुसार मार्चअखेरीस महापालिकेला तो सादर करण्यात येणार आहे.
सातारा रस्त्यावर जेधे चौक आणि चैतन्यनगर येथे उड्डाण पूल आहेत. त्यातच लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील साईबाबा मंदिराजवळ, प्रेमनगर चौकात आणि भारती विद्यापीठासमोर पादचारी भुयारी मार्ग आहेत.
इंदिरानगरमध्ये मेट्रोसाठी डेपो
चैतन्यनगरजवळही महापालिकेने पादचारी उड्डाण पूल उभारला आहे. यामध्ये भरीसभर म्हणजे अहल्यादेवी होळकर चौक ते चैतन्यनगर चौकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नियोजित रस्ता रुंदीकरणही झालेली नाही. त्यामुळे सातारा रस्त्यावरून एलिव्हेटेड मेट्रो शक्य नसल्याचे महामेट्रोमधील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यावर उपाय म्हणून स्वारगेटपासून मेट्रो एलिव्हेटेड पद्धतीने मुकुंदनगर, मार्केट यार्ड, गंगाधामजवळून गोकुळनगर आणि कात्रज चौकामध्ये आणावी, असा पर्याय आमदार माधुरी मिसाळ यांनी सुचविला आहे. त्यात अप्पर इंदिरानगरमध्ये मेट्रोसाठी डेपो करणे शक्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
एक किमीसाठी 800 कोटी खर्च
बिबवेवाडीमार्गे मेट्रो सातारा रस्त्याला जोडण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. श्रीनाथ भिमाले यांनी सातारा रस्त्यावरूनच भुयारीपद्धतीने मेट्रो कात्रजपर्यंत नेण्यात यावी, असा पर्याय सुचविला आहे. मेट्रोच्या एक किलोमीटर भुयारी मार्गासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च येतो. स्वारगेटपासून कात्रज सुमारे 20 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे भुयारी मेट्रो करायची झाल्यास खर्चात किमान 50 टक्के वाढ होऊ शकते. त्यातून भुयारी मेट्रोच्या एक किलोमीटरसाठी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च येणार आहे. सातारा रस्त्यावरून मेट्रो गेल्यास प्रवासी संख्याही पुरेशी मिळू शकते, असे महामेट्रोला सांगण्यात आले आहे.
मेट्रो मार्गांचे किमान दोन पर्याय
स्वारगेट-कात्रजदरम्यान मेट्रो मार्गासाठी तीन पर्याय आले आहेत. त्यावर नागरिकांनीही अनेक सूचना केल्या आहेत. तिन्ही मार्गांवर मेट्रोसाठी प्रवासी किती उपलब्ध होतील, याचा अभ्यास सुरू आहे. या संपूर्ण बाबींचा विचार करून मेट्रो मार्गांचे किमान दोन पर्याय महापालिकेला सुचविण्यात येतील. त्यासाठी प्रकल्प अहवाल मार्चअखेर सादर होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक, ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.