स्वारगेट मेट्रो स्थानकासाठीचा प्रस्ताव सादर

0

पुणे । महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) ‘मल्टिमॉडेल हब’साठी स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाची जागा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. महामेट्रोने पालिकेकडे स्वारगेट येथे मल्टिमॉडेल स्थनकासाठी पाच हेक्टर जागेची मागणी केली होती. मात्र, पुणे महापालिकेने तीन हेक्टर जागा महामेट्रोला देण्यास अनुकूलता दर्शवली असून तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला गेला आहे. पुणे मेट्रोने स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गावर स्वारगेट येथे मेट्रोचे स्टेशन उभारण्यासाठी जेधे चौकातील जवळपास 5 हेक्टर जागेची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र, ही जागा पाणीपुरवठा विभागाची असल्याने पाणीपुरवठा विभागाने ही जागा देण्यास विरोध दर्शविला होता, त्यामुळे या जागेबाबतही पेच निर्माण झाला होता. परिणामी, मेट्रोच्या कामात व्यत्यय येण्याची भीती व्यक्त केली जात होती.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोला हव्या असलेल्या जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार स्वारगेटच्या जेधे चौकालगत वॉटर वर्क्सची 13 ते 14 एकर जागा आहे. त्यामधील जवळपास अर्धी म्हणजे सात ते साडेसात एकर (3 हेक्टर) जागा मेट्रो स्टेशनसाठी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामधील उर्वरित जागा पाणीपुरवठा विभागासाठी ठेवण्यात येणार आहे. मेट्रोला देण्यात येणारी जागा ही दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आला आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुख्यसभेत मांडण्यात येईल.