स्वारगेट-हडपसर मार्गावर ‘सिंक्रोनायझेशन’

0

शहरातील 20 मार्ग प्रस्तावित : प्रशासकीय अधिकार्‍यांची माहिती

पुणे : शहरातील प्रस्तावित 20 मार्गांपैकी सुरुवातीला दोन मार्गांवर प्रायोगित तत्त्वावर सिंक्रोनायझेशन चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मनपा ते ब्रेमेन चौक आणि स्वारगेट ते हडपसर हे मार्ग निवडले आहेत. येत्या दोन दिवसांत चाचणी सुरू होईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या 20 मार्गांचा सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेदरम्यान रस्त्यांवरील चौकांची संख्या, होणारी कोंडी, लागणार्‍या वेळेचा प्राथमिक अभ्यास करून या मार्गांवरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्याचे सूचवण्यात आले आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या मदतीने हे काम करण्यात येणार असून तसा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला देण्यात आला होता. यावर स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासनाने काम सुरू केले आहे. सुरुवातीला दोन मार्गांवर सिंक्रोनायझेशन चाचणी घेण्याचे ठरवण्यात आले आहे. चाचणीदरम्यान येणार्‍या अडचणी जाणून घेण्यात येणार असून त्यानंतर उर्वरीत मार्गांवर सिंक्रोनायझेशन कार्यान्वित केले जाणार आहे.

न्युक्लिऑनिक्स एजन्सीला दिला कामाचा ठेका

सिंक्रोनायझेशनसाठी लागणारा वेळ वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या दोन मार्गांवर नव्याने टायमिंग सेट करावा लागणार आहे. हे काम न्युक्लिऑनिक्स ट्रॅफिक सोल्यूशन या एजन्सीला देण्यात आले आहे, असे प्रशासकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.