विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे आणि व्याख्यानमालेचे भोसरी येथे उद्घाटन
भोसरी : संत महात्म्ये किंवा राष्ट्रपुरुष कोणत्याच जाती-धर्माचे नसतात. मात्र, अनुयायांनी आपल्या व्यावहारिक सोयीसाठी आणि स्वार्थासाठी त्यांना जाती-धर्माच्या चौकटी लादून दिल्या. बंधुतेचे मारेकरी सर्व जाती धर्माचे लोकच आहेत. यामुळे माणसा-माणसातील बंधुभावनेला मोडीत काढण्याचे पाप केले आहे, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व 20 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्यावतीने विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे उद्घाटन अॅड.भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषण करताना डॉ.सबनीस बोलत होते. यावेळी प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, प्रा.डॉ.अशोककुमार पगारिया, हाजी अफझलभाई शेख, प्राचार्य डॉ.अशोक शिंदे, डॉ.अश्विनी धोंगडे, महेंद्र भारती, कवी चंद्रकांत वानखेडे, मधूश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके, शिवाजीराव शिर्के, हरिश्चंद्र गडसिंग आदी उपस्थित होते. प्रथम राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. यामध्ये साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिसूत्री
हे देखील वाचा
डॉ.सबनीस पुढे म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या गाभ्याचे अधिष्ठान स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सुत्रावर आधारीत आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारले आहे का, हा प्रश्नच आहे. स्वातंत्र्य व समता या दोन तत्वांना अति महत्त्व देऊन राज्यकारभार केला. प्रबोधनही याच मार्गाने केले जाते. पण बंधुता नसेल तर या दोन तत्वांना अर्थ नाही. फ्रेंच राज्यक्रांतीतही हेच दिसते. त्याचीच पुनरावृत्ती भारतीय लोकशाहीत कायम राहिलेली दिसते. बंधुता तिसर्या स्थानी आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे, की बंधुताच शोषणमुक्त भारत निर्माण करु शकते. अर्थात भारतीय समाजाला सम्यक क्रांतीची गरज आहे, पण ती क्रांती सर्वांसाठी हवी. पण सर्वांमध्ये बंधुभाव असल्याशिवाय हे शक्य नाही. बंधुता ही भावना आणि विचार आहे. मुळात बंधुता ही संकल्पनाच भावना व विचार यांची एकात्मता सिद्ध करणारे मूल्य आहे. त्यामुळे बंधुतेच्या संकल्पनेत मानवता, करुणा, प्रेम, वात्सल्य, दया या मूल्यांचा अंतर्भाव आढळतो. समाजात परिवर्तन घडवायचे असेल, तर बंधुता अत्यंत आवश्यक आहे.
आज परिस्थिती उलट
अॅड. आव्हाड म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यावेळचे राज्यकर्ते आणि आजचे राज्यकर्ते यात खूप मोठा फरक आहे. त्यावेळचे राज्यकर्ते आपल्या संसाराची होळी करून देशाचा विचार करायचे. आज याउलट परिस्थिती झाली आहे. देशाची होळी करून स्वत:चा संसार फुलवणार्यांना आपण नमस्कार करतो. त्यामुळे हे मुखवटे फाडण्याची गरज निर्माण झाली आहे. आज राष्ट्रपुरुष जातीजातीत विभागले गेले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. राजकारण खुज्या विचारांच्या लोकांच्या हातात गेल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. वैचारिक विरोध वरचेवर नाहीसा होत चालला आहे. केवळ अर्थकारण बघितले जाते. त्यामुळे स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय ही तत्वे समृद्ध केली पाहिजेत. प्रकाश जवळकर व प्रकाश रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच, डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषण पुस्तकाचे प्रकाशन, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या बंधुताचार्याची प्रकाशगाथा ग्रंथाचे प्रकाशन, प्रकाश रोकडे संपादित अग्निकुंड समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन, मूल्याविष्कार या संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन, पवनेचा प्रवाह साप्ताहिक विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर अत्रे यांनी, तर हाजी अफझलभाई शेख यांनी आभार मानले.