स्विकृत सदस्यांसाठी निवडणुक होणार

0

विशाल दाभाडे, सचिन टकले यांचे राजीनामे मंजुर

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील दोन स्वीकृत सदस्यांचे राजीनामे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंजूर केले असून रिक्त स्वीकृत सदस्याची निवडणूक नगराध्यक्षा केव्हा घेणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत सदस्य विशाल दाभाडे व सचिन टाकले यांचे राजीनामे राव यांनी मंजूर केले असून त्यांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना निर्णयानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मध्ये सदस्य संख्याबळानुसार 3 स्वीकृत सदस्य आहेत. भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास आघाडी, रिपब्लीकन पक्ष यांच्या महाआघाडीला नगरपरिषदे मध्ये स्पष्ठ बहुमत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे 14, आणि जनसेवा विकास आघाडीचे 6 नगरसेवक आहेत. तर विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे 6 सदस्य आहेत. एक वर्षापूर्वी झालेल्या स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास आघाडी आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती याना प्रत्येकी एक स्वीकृत सदस्याची जागा मिळाली होती.

भाजप सदस्याने राजीनामा न दिल्याने निवडणूकीकडे लक्ष
त्यानुसार भारतीय जनता पक्षाने इंदरमल ओसवाल, जनसेवा विकास आघाडीचे सचिन टकले आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे विशाल अशोक दाभाडे यांना स्वीकृत सदस्य केले होते. पक्ष श्रेष्ठीने प्रत्येकाला एक वर्षाची मुदत दिली होती. ठरलेल्या मुदतीप्रमाणे टकले आणि दाभाडे यांनी राजीनामे दिलेले आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ स्वीकृत नगरसेवक इंदरमल ओसवाल यांनी राजीनामा न दिल्याने निवडणूकीच्या कार्यक्रमकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.