मुंबई (राजा आदाटे)। ‘स्वामी तीन्ही जगाचा आई विना भिकारी’, अशी एक म्हण आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला आईची आठवण येते. आज तीलाही तीच्या जन्मदात्र्या आईला कडकडून मिठी मारण्याची इच्छा आहे. म्हणून ती 38 वर्षानंतर शोध घेत आहे आपल्या मातेचा. ती सध्या स्विडन मधे राहते. तीथे ती नामांकीत अॅथेलेट आहे. सर्व सुखं आहेत तीच्या पायाशी.. फक्त आईच्या मायेचा हात तीला पाठिवरून फिरवून घ्यायचा आहे. म्हणून तीचा शोध सुरू आहे मुंबईत हरवलेल्या तीच्या पालकांचा. त्यासाठी ती सोमवारी 13 मार्चला मुंबईत येत आहे.
सायन हॉस्पीटलच्या आवारात सापडली ती
13 ऑक्टोबर 1981 ला ती सायन हॉस्पीटलच्या आवारात रडताना एका हवालदाराला सापडली. एक ते सव्वा वर्षाची असेल तेव्हा ती. त्यांनी तीला उचलून घेतली. सर्वत्र चौकशी कोणीही प्रतिसाद दिला नाही. पहिल्यांदा तिचे नाव बेबी म्हणून नोंदवले गेले. मात्र नंतर तीन दिवसांनी ते कमलिनी असे नोंदले गेले. तीला त्यावेळी सोबत दिली ती पुरूष पोलिस काऊंस्टेबल बक्कल नंबर 20086/एम आणि महिला पोलिस काऊंस्टेबल(डब्लूपीसी) बक्कल नंबर 132/के या दोघांनी. इतकेच रेकॉर्ड तीच्याकडे सध्या उपलब्ध आहे. त्यांचे नाव काय? ते हयात आहेत की नाहीत त्याची कल्पना तीला नाही. तीला मदत करत आहेत ‘सखी’ संस्था पुण्याच्या अंजली पवार. त्यांची धडपड त्यासाठी चालू आहे. पोलिसांनी तीला सायनच्या सेवा संस्थेच्या हवाली केले. तेथे लहान मुलांना अॅडाप्ट करण्यासाठी स्विडनचे एक दाम्पत्य आले. ते तीला घेवून गेले. ती सध्या जेसीका लींढेर नावाने मॅल्मो शहरात ओळखली जाते. स्वीडन मध्ये हे शहर आहे.
आतापर्यंत 40 मुलांना त्यांचे पालक भेटले
आपले आई वडिल हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहचवण्याचे काम पुण्यातील सखी संस्था करते. त्यांनी आतापर्यंत 40 मुलांना त्यांचे पालक भेटवून दिले आहेत. कमलिनी उर्फ जेसीका हिने इंटरनेटवर या संस्थेला संपर्क साधून तीची हकिकत सांगितली आहे. आता तीच्या आई वडिलांचा शोध सुरू झाला आहे.
आम्ही प्रयत्न करतो आहोत. पोलीस आणि प्रसिध्दी माध्यमांनी आम्हाला सहकार्य केले तर जेसिकाला तिच्या माता-पित्यांची भेट होणे शक्य होईल
– अंजली पवार
कन्सल्टंट, सखी, पुणे.