सिडनी: क्रिकेट सामन्यांमध्ये दुखापतींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक शेफील्ड शील्ड स्पर्धेतील एका सामन्यात युवा यष्टीरक्षकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण झोनकडून खेळणारा जेक लेहमन फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटचा फटका थेट यष्टीरक्षकाच्या डोक्याला लागला. लेहमनचा फटका इतका जोरदार होता की यष्टीरक्षक सेम हार्पर जागीच कोसळला. ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात झालेल्या सामन्यात पहिल्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना हा प्रकार घडला.
अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याची भीती
फलंदाज जेक लेहमन याने लेग साईडवर स्विप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी यष्टीरक्षणासाठी यष्टीच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या सेम हार्पर याच्या डोक्यावर लेहमनची बॅट लागली. बॅट डोक्यावर आदळल्यानंतर हार्पर जागीच कोसळला. सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली. हार्परने हेल्मेट परिधान केले असतानाही फटका इतका जोरदार होता की तो जागीच कोसळला. हार्परला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्यावर फटका लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याची भीती निर्माण झाली होती. पण सुदैवाने हार्परला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर हार्परला सोडले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या शॉटमुळे यष्टीरक्षकाला दुखापत झाल्याचे हा दुसरा प्रसंग आहे. गेल्याच महिन्यात बीग बॅश लीगमध्ये ब्रॅड हॉज फलंदाजी करताना त्याची बॅट यष्टीरक्षक पीटर नेव्हील याच्या तोंडावर आदळली होती. नेव्हीलचा जबड्याला दुखापत झाली होती.