स्विस बँकेत नव्हे, तर आशियाई देशात भारतीय जमा करतायत काळा पैसा

0

चंदिगड । भारतीयांच्या परराष्ट्रात असलेल्या काळा पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्राला याचा सुगावा लागल्यानंतर आता काळा पैसेधारक भारतीयांनीही पैसे ठेवण्याच्या ठिकाणात बदल केले आहे. 2015मध्ये भारतीयांचे 4 लाख कोटी रुपये परदेशात जमा होते, याचा खुलासा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स(बीआयएस)च्या रिपोर्टमधून झाला आहे. केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळात स्विस बँकेतील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठीही मोहीम उघडली आहे. मात्र या भारतीयांच्या काळ्या पैशाचा मोठा हिस्सा आशियाई टॅक्स हेवनमध्ये दडलेला आहे.

काळा पैशाची ही आहे आकडेवारी
1 2015मधल्या देशातील जीडीपीच्या जवळपास 3 टक्के एवढी आहे. तसेच 2007 पासून 2015पर्यंत परराष्ट्रात जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशात 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2 विशेष म्हणजे आता भारतीय स्विस बँकेत नव्हे, तर आशियाई देशांत पैसे जमा करण्याला प्राधान्य देत आहेत. स्विस बँकेत 2015मध्ये फक्त 31 टक्के काळा पैसा जमा होता.
3 हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, मलेशियासारख्या आशियाई देशातील बँकांत भारतीयांनी जवळपास 53 टक्के हिस्सा जमा केला आहे.

पनामा पेपर्स प्रकरणातून उघड झाली माहिती
भारतासह अन्य देशांतील लोक काळा पैसा लपवण्यासाठी स्विस बँकेऐवजी आशियाई टॅक्स हेवन बँकांना प्राथमिकता देत असल्याचंही पनामा पेपर्स प्रकरणातून बाहेर आले आहे. जर सरकारने काळा पैसा भारतात आणण्यासाठी गंभीर असेल, तर त्यांनी स्विस बँकेसह आशियाई टॅक्स हेवन्स बँकांवरही लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा ब्रिटनस्थित एका संस्थेने भारतातल्या काळा पैशासंदर्भात खुलासा केला होता. या आकड्याची सामान्यांना कल्पनाही करवणार नाही, इतका तो मोठा आहे.