पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सर्वच विषय समित्या व पदांच्या निवडी झाल्याने आता राष्ट्रवादी व भाजपमधील कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीचे वेध लागले आहे. त्या पदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी खासगीत भेटी-गाठी व मुंबई वार्या चालू आहेत. सभागृहातील संख्याबळानुसार भाजपला तीन तर राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा येत असल्याने मोठी रस्सीखेच आहे. भाजपकडून आमदार महेश लांडगे गटातून विजय फुगे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर तसेच, आमदार लक्ष्मण जगताप गटाकडून सारंग कामतेकर, मोरेश्वर शेंडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांच्या नावांचा विचार होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून नीलेश पांढरकर, प्रशांत शितोळे यांच्यासह माजी आमदार विलास लांडे ऐनवेळी सुचवतील ते नावही पुढे येण्याची शक्यता आहे.
अनेकांना स्वीकृत सदस्यपदाचे आमिष
या वर्षापासून शिक्षण मंडळ बरखास्त होणार असल्यामुळे महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपामधील असंतोष थांबविण्यासाठी प्रमुख पक्षांकडून अनेक कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाचे आमिष दाखवले गेले. पक्षश्रेष्ठींवर विश्वास टाकत अनेकांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी कोणत्या उमेदवाराला दिलेल्या शब्दाला जागणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
आमदारद्वयींचा प्रभाव जाणवणार
शहरात आमदार लांडगे व आमदार जगताप यांच्या शब्दाला वजन मोठे आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी सुचविलेल्या उमेदवारांच्या गळ्यात स्वीकृत सदस्यपदाची माळ पडणार, हे नक्की आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातून आमदार लांडगे गटातून उच्चशिक्षित व बांधकाम व्यावसायिक विजय फुगे व माजी नगरसेवक शांताराम भालेकर या दोघांपैकी एकाचे नाव पुढे येण्याची शक्यता लांडगे यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवली जात आहे. तर आमदार जगताप गटाकडून चिंचवड मधील मोरेश्वर शेंडगे व सारंग कामतेकर यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच आझमभाई पानसरे यांना राज्य पातळीवर कॅबिनेट दर्जाचे पद दिले जाण्याची शक्यता असल्याने त्यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांनादेखील संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून नीलेश पांढारकर आघाडीवर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी प्राधिकरण व आकुर्डीच्या अनेक सभांमध्ये माजी नगरसेवक नीलेश पांढरकर यांना स्वीकृत सदस्य केले जाईल, असे यापूर्वी वारंवार सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे नाव राष्ट्रवादीकडून प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसर्या जागेसाठी चिंचवड व भोसरी मतदारसंघातून तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सभागृहातील परखड व अनुभवी वक्ता म्हणून भाऊसाहेब भोईर व भोसरी मतदारसंघातून लांडे गटातून जालिंदर शिंदे यांचेदेखील नाव पुढे येऊ शकते.