सुपरमाईंडच्या अध्ययन संचाचे प्रकाशन समारंभ
पिंपरीः ज्ञानरचनावाद, व्यवहारोपयोगी शिक्षण, स्वमताला महत्व व कृतीशीलता ही नव्या दहावीची ठळक वैशिष्ट्य आहेत. आताचा बदललेला अभ्यासक्रम घोकमपट्टीने करण्यापेक्षा स्व-अध्ययन पद्धतीने केल्यास विद्यार्थ्यांना दहावीच काय तर सर्व परीक्षांमध्ये यश मिळेल, असे मत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. बदललेल्या दहावी अभ्यासक्रमावर आधारित पुण्यातील सुपरमाईंड संस्थेने निर्मिलेल्या स्व-अध्ययन संचाचे प्रकाशन विनोद तावडे यांच्या हस्ते नुकतेच नागपूर येथे झाले. उद्घाटनप्रसंगी पुण्याच्या आमदार व महाराष्ट्र मराठी भाषा समितीच्या अध्यक्षा प्रा. मेधा कुलकर्णी, सुपरमाईंडच्या संचालिका मंजुषा वैद्य, अर्चिता मडके, दया कुलकर्णी व अजय भर्ताव आदी उपस्थित होते.
स्व-अध्ययन ही काळाची गरज
विनोद तावडे पुढे म्हणाले की, स्व-अध्ययन ही काळाची गरज आहे. पाठ्य पुस्तकातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची नेमकी दिशा, विचार, माहिती व ज्ञान दिले जाते. पण, विद्यार्थ्यांनी स्व-अध्ययनाद्वारे त्याचा उपयोग करून स्वतःला सिद्ध करावे. प्रा. मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या, स्व-अध्ययन संचाची निर्मिती म्हणजे पाठांतराच्या पारंपरिक अभ्यास पद्धतीला छेद देवून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी सक्षम करणे आहे. पुण्याच्या सुपरमाईंड संस्थेने हे पाऊल उचलले आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो.
दहावीकरिता बनविण्यात आलेल्या या अध्ययन संचातून विद्यार्थ्यांना स्व-अध्ययन सहजपणे साध्य करता येईल. स्वतःहून पाठ्यपुस्तकाच्या आधारे उत्तर शोधणे, नेमके कुठे चुकते आहे ते टाळणे या तत्वावर अध्ययन संच तयार केला आहे. दस्तूर इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्ञानगंगा हायस्कूल, विद्या विकास हायस्कूल, समाजभूषण हायस्कूल, रामचंद्र राठी हायस्कूल, पंडितराव आगाशे स्कूल, अहिल्यादेवी स्कूल, अशोक विद्यालय या शाळांना संस्थेतर्फे स्व-अध्ययन संचाचे मोफत वितरण केले गेले.