जामखेडच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात जागवल्या आठवणी
जामखेड – स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे संघर्षशील नेते होते, आयुष्यभर त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष केला. त्यांचा हाच संघर्षाचा वारसा घेऊन मी काम करत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करत आहे. या वाटचालीतुनच मी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
नगर जिल्ह्यातील जामखेड येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन , रक्तदान शिबीर व सर्वरोग निदान मोफत उपचार शिबीराचे ही आयोजन करण्यात आले होते.
त्यांच्या डोळ्यातील मला कळायचे
स्व. मुंडे साहेब यांनी जिवंत असतांना लोकांच्या मनात, हृदयात आणि नसताना बहुजनांच्या देव्हा-यात स्थान मिळवले आहे. मी त्यांच्या सोबत 20 वर्ष सावलीसारखे काम केले आहे, इतर कोणाही पेक्षा जास्त त्यांचा संघर्ष मी पाहिला आहे. त्यांच्या मनातले मला आणि माझे त्यांना न बोलता ही डोळ्यात पाहून समजायचे इतके आमचे घट्ट नाते होते.
आदर्श भाऊ
स्व. पंडितअण्णा यांनी त्यांची जडणघडण केली ते दोघे आदर्श भाऊ होते. मात्र समाजाने आम्हालाच 5 वर्ष खलनायक ठरवले याची खंत धनंजय मुंडे यांनी बोलावून दाखवली. मुंडे साहेब हे एका जातीचे नव्हते तसेच एका पक्षाचेही नव्हते त्यांना एका जातीत आणि पक्षात बांधून ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले. रक्ताच्या नात्यात असूनही दुसऱ्या कोणत्याही वारशापेक्षा मोठा जनसामान्यांसाठी संघर्ष करण्याचा वारसा आपल्याला मिळाल्याचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले. स्व. मुंडे साहेब यांच्या अनेक आठवणी जागवताना ते गहिवरुन गेले होते.