नारायणगाव । स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी, पुणे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने नारायणगावातील धर्मवीर संभाजी पतसंस्था संचलित स्व. गुलाबराव डेरे (पाटील) सार्वजनिक वाचनालयाला 10 हजार रुपयांचे ग्रंथ देऊन सन्मानीत करण्यात आले.
ग्रामीण भागात वाचन संस्कृती संवर्धन आणि विकास करणार्या नोंदणीकृत संस्थांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आल्याचे संस्थापक वसंतराव देशमुख व अध्यक्ष मेहबूब काझी यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्ताने निगडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. विनोद बंसल, राजन लाखे, विनिता ऐनापुरे, प्रदीप पाटील, विवेक जोशी, भास्कर रीकामे, सुमती कुलकर्णी, संजय जगताप, शंकरराव कोल्हे, मेहबूब काझी, राजेंद्र कोल्हे, प्रविण डेरे, सुभाष दरंदाळे, एकनाथ तांबे, प्रमोद डेरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
संगणक प्रशिक्षण केंद्र उभारणार!
शासकीय निधी उपलब्ध करून लवकरच स्व. गुलाबराव डेरे (पाटील) वाचनालयाची सुंदर इमारत उभी केली जाणार असल्याचे धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे सल्लागार आणि उपसरपंच संतोष दांगट तसेच सचिव ज्ञानेश्वर औटी यांनी यावेळी सांगितले. नारायणगाव येथे डेरे वाचनालयाच्या वतीने संगणक प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तक विभाग सुरू करण्यासाठी सावरकर मंडळाच्या वतीने भविष्यात मदत केली जाईल असे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी सांगितले.