स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा न उभारल्यास आंदोलन

0

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली उपायुक्त मुठे यांची भेट

जळगाव– शहरातील स्वंतत्र चौकात रिमांडहोमच्या कोपर्‍यावर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या महासभेत ठराव मंजूर करुन पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून देखील ठरावाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी उपायुक्त अजित मुठे यांची भेट घेतली. 23 जानेवारीपर्यंत पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात न झाल्यास सेनास्टाईल आंदोनल करुन आमच्या पध्दतीने पुतळा बसविला जाईल,असा इशारा देखील देण्यात आला आहे.

23 जानेवारीला पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी

महापालिकेच्या महासभा व स्थायी समिती सभांमध्ये पाठपुरावा करुन देखील महापालिका प्रशासनाकडून पुतळा उभारण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात होत नसल्याने आज गुरुवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी धडक देत उपायुक्त अजित मुठे यांची भेट घेतली. यावेळी महापालिका विरोधीपक्षनेते शिवसेनेचे सुनिल महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी संतप्त शिवसैनिकांसह गजानन मालपुरे यांनी उपायुक्त यांना स्व. बाळासाहेब शिवसैनिकांसह जनतेसाठी देखिल आदारणीय आहेत. त्यांचा पुतळा उभारण्याचा ठराव होवून देखील महापालिका प्रशासनाकडून विलंब होत असल्याबद्दल विचारणा केली.

महापालिका प्रशासनाने 23 जानेवारीला पुतळा उभारणीच्या कामाचा शुभारंभ करावा असे सांगीतले. 23 जानेवारीपर्यंत पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात न झाल्यास सेनास्टाईल आंदोनल करुन आमच्या पध्दतीने पुतळा बसविला जाईल, त्यावेळी काही कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील असा ईशारा देखील यावेळी देण्यात आला. उपायुक्तांना यावेळी निवेदन देतांना शेखर शिंपी, विजय राठोड, विजय चौधरी, राहुल नेतलेकर, भैय्या वाघ, शिवराज पाटील, जितेंद्र बारी, मंहेंद्र पाटील विनायक पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.