जळगाव। ‘काका मेंडकी हे व्यक्ती नव्हे तर लोकांना घडविणारे चालते- बोलते विद्यापीठच होते. समर्पित भावनेने त्यांनी आयुष्यभर समाजाचा संसार केला. त्यांचा विचारांचा वारसा कुटुंबानेही पुढे चालवित 25 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला ही घटनाच मला सुखावणारी आहे. येत्या मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मी स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांना मेंडकी परिवाराच्या वतीने सुपूर्द करणार आहे. कसे जगावे या परिपाठ काकांनी दिला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ युवापिढीला प्रेरणादायी ठरेल, अशी प्रबोधिनी जिल्ह्यात सुरू व्हावी यासाठी सहकार्य करु अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संभाजीनगर येथे स्व. चंद्रकांत मेंडकी मार्गाची कोनशिला अनावरणप्रसंगी दिली. मान्यवरांतर्फे श्रीमती विजयाताई मेंडकी यांचा कृतज्ञता सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटन व प्रमुखपाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला़
रक्ताच्या नात्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा परिवार वाढविला
“स्व़ मेंडकीकाकांनी अनेकांना मार्गदर्शन केले, त्यांचे कार्य महान आहे़ त्यामुळे या छोट्या रस्त्याला जरी त्यांचे नाव दिले असले तरी शेवटी हाच रस्ता महामार्गापर्यंत पाहचतो़े़ गतकाळात त्यांनी लावलेल्या छोट्या रोपाचे वैयक्तीक स्वार्थ न पाहता पक्ष, जनसंघ वाढीसाठी सदैव प्रयत्न केल्यामुळे विस्तीर्ण वटवृक्षात रुपांतर झाल्याचे श्रेय मेंडकीकांनाच असून माणसे घडवितांना कोणतेच मतभेद न ठेवता रक्ताच्या नात्यापेक्षा कार्यकर्त्यांचा परिवार घडविला. प्रमोदजी, मुंढेजी सुद्धा काकांचा सल्ला घेत असत कारण त्यांची निपक्ष भूमीका असायची़ असे मत आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले़
जमिनीवर बसून आकाशाची दृष्टी दिली
ना. गिरीष महाजन यांनी निस्वार्थ भाव म्हणजेच मेंडकीकाका होय. भाड्याच्या सायकलीने त्यांनी गावोगावी पायपीट केली, संघटन वाढविले, माझेवर त्यांनी वारंवार संस्कार केले म्हणून मी या परिवारात राहू शकलो, पक्ष उभारणीच्या काळात जमीनीवर बसून आकाशाची दृष्टी दिली या शब्दात आलेख मांडला.
अध्यक्षीय समारोप करतांना गुणवंतराव सरोदे यांनी 1978 पासूनच्या पक्षविस्तारात काका मेंडकींचे योगदान महत्त्वाचे असून विघटीत समाज एकत्रित करुन जातीवंत कार्यकर्ता निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यामुळेच पक्ष सुस्थितीत आहे, असे स्पष्ट केले. संचालन गिरीष कुलकर्णी, प्रास्ताविक उदय भालेराव, स्वागत आ. सुरेश भोळ,आभारप्रदर्शन महेश जोशी यांनी केले.
यांची होती उपस्थिती
माजी खासदार डॉग़ुणवंतराव सरोदे ना. गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ना. दिलीप कांबळे, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, डॉ़ राजेंद्र फडके, खासदार ए़ टी. नाना पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ़ सुरेश भोळे, आ़ स्मिता वाघ, आ़ चंदूलाल पटेल, महापौर नितीन लढ्ढा ,जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, संघटक किशोर काळकर, मनपा विरोधी पक्षनेते वामन खडके, गटनेते सुनिल माळी, विजयाताई मेंडकी, शहिद सुभाष पाटील यांचे पिता पुंडलीक राजाराम पाटील व माता इंदूबाई पुंडलीक पाटील आदी उपस्थित होते़