हंगामी दरवाढ केली रद्द

0

पिंपरी : दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन मंडळाने हंगामी तिकिट दरवाढ करण्यात आली होती. मात्र सध्या ती दरवाढ मागे घेण्यात आली आहे. पंढरपूर येथे होणार्‍या कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने वारकरी कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. अलंकापुरीतही गर्दी होत असते. दिवाळीच्या निमित्ताने एस. टी. ने केलेली 10 टक्के दरवाढ यात्रेच्या कालावधीत कपात करावी अशी मागणी वारकर्‍यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी चार दिवस आधीच दर कपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यभरातून आळंदी, पंढरपूर येथे येणार्‍या वारकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी सणाच्या कालावधीत दरवर्षीच तिकीट दरवाढ करण्यात येत असते. यंदा 31 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत ही दरवाढ करण्यात आली होती. मात्र, कार्तिकी यात्रा 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याने या दरवाढीची झळ वारकर्‍यांना बसू नये यासाठी मुदतपूर्व दर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.