‘हंपी’ येथील छायाचित्रांचे मंगळवारपासून प्रदर्शन

0

पिंपरी-चिंचवड : पाच पर्वतांमध्ये असणार्‍या कर्नाटक, विजयनगर साम्राज्याची राजधानी, कला व स्थापत्यशास्त्राचा अपूर्व संगम असलेल्या ’हंपी’ येथील उत्कृष्ट छायाचित्रे पिंपरी-चिंचवडकरांना पाहायला मिळणार आहेत. चिंचवड येथील छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी तीन वर्षात टिपलेल्या या छायाचित्रांचे 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन होणार आहे. चिंचवडगाव येथील पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स या सुवर्णपेढीमध्ये असलेल्या कलादानामध्ये प्रदर्शन होणार आहे. सकाळी अकरा वाजता आंतरराष्ट्रीय चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल.

छायाचित्रांसाठी लागली तीन वर्षे
सन 1336 ते 1565 या सव्वादोनशे वर्षाच्या कालावधीमध्ये वैभवशाली असलेले विजयनगरचे साम्राज्य पाच मुघल साम्राज्यांनी सहा महिन्यात लुटून नेले. त्यानंतरही ’हंपी’ येथे कला व स्थापत्यशास्त्राचा अपूर्व संगम पाहण्यास मिळत आहे. या भग्ननगरीला 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले. ’हंपी’ हे प्रचंड सुंदर शहर असून पाच पर्वतांमध्ये वसले आहे.’हंपी’ची छायाचित्रे काढण्यासाठी तीन वर्षांचा काळ लागला. वेगवेगळ्या ऋतुत ही छायाचित्रे ’निकॉन’ कॅमे-याने टिपली आहेत. ’हंपी’ची पिंपरी-चिंचवडकरांना माहिती व्हावी, याच उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे, असे कशाळीकर यांनी सांगितले.