हंबर्डीकर चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रेल्वेचा पुढाकार

0
पालिका प्रशासनासह रेल्वे अधिकार्‍यांकडून जागेची पाहणी
भुसावळ- शहरातील रेल्वेच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा दुवा असलेल्या रेल्वे लोखंडी पुलाजवळ वाहतुकीची होत असलेली कोंडी पाहता रेल्वे प्रशासनाने ती दूर करण्यासाठी पावले उचचली आहेत. रेल्वे हद्दीतून गेलेल्या या मार्गाची रूंदी वाढवण्यासाठी व हंबर्डीकर चौकातील कोंडी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन आहे. बुधवारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यासह रेल्वेचे मंडल अभियंता एम.एस.तोमर यांनी या भागाची पाहणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार हंबर्डीकर चौकातील खाजगी व्यापार्‍यांना रेल्वेच्या हद्दीत कायमस्वरूपी जागा देऊन रस्त्याची रूंदी दोनपट वाढवल्यानंतर या मार्गावरील कोंडी कमी होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्याधिकारी लवकरच तयार करून सभागृहापुढे ठेवतील तर खाजगी दुकानदारांशी रेल्वे काय वाटाघाटी करते ? हे आगामी काळात कळणार आहे.
वरणगाव रस्त्यावरील कोंडीदेखील होणार दूर
रेल्वेने यापूर्वीच बसस्थानकाचे स्थलांतर करण्यासंदर्भात आगारप्रमुखांना पत्र दिले आहे. रेल्वे प्रशासन रेल्वे स्थानकाचा विकास करीत असून लवकरच लोहमार्ग पोलीस ठाण्याची इमारत पाडली जाणार असून या भागातून पंधरा बंगला भागाला जोडणारा रस्ता वरणगाव रस्त्याला व शिवाजी नगरातून पालिकेकडे येणार्‍या मात्र रेल्वे हद्दीतील रस्त्यांची रूंदीदेखील वाढवण्यात येणार आहे. त्या संदर्भातही बुधवारी अधिकारी पाहणी करून चर्चा केली. याप्रसंगी पालिकेचे माधव पाटील, महेश चौधरी आदींची उपस्थिती होती.