हंबर्डीकर रस्ता किमान 25 वर्ष टिकणार : रस्ता लोर्कापणप्रसंगी आमदार संजय सावकारे यांची ग्वाही

भुसावळ शहरातील रेल्वे लोखंडी पुल मार्गाचे लोकार्पण

Inauguration of railway railway bridge route in Bhusawal city भुसावळ : सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत शहरातील श्री संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी ब्रीज या मार्गावरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते या रस्ता कामाचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, रस्ता उद्घाटनप्रसंगी आमदार संजय सावकारे म्हणाले की, अल्पावधीतच या रस्त्याचे ठेकेदाराने काम पूर्ण केले असून ते योग्य प्रकारे पूर्ण केले असून किमान 25 वर्ष हा रस्ता टिकेल हा विश्वास आहे.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक प्रा.दिनेश राठी, युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, राध्येश्याम लाहोटी, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास माजी नगरसेवक पिंटू ठाकूर, राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, निकी बत्रा, गिरीश महाजन, अजय नागराणी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात रस्त्यांची कामे वेगात : आमदार
आमदार सावकारे म्हणाले की, टप्प्या-टप्प्याने शहरातील जळगाव रोड, जामनेर रोड व खडका रोड भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. हंबर्डीकर बेकरी रस्त्याच्या कामाबाबत तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने निधी मंजूर झाल्यानंतर कामाला सुरूवात झाली. गुलाबरावांसह मंत्री गिरीश महाजनांना कार्यक्रमासाठी निरोप देण्यात आला मात्र वेळेअभावी ते येवू शकले नाहीत. बोगद्यात आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक दिवे लावण्यात आल्याने वाहनधारकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेने येथे आता सीसीटीव्ही लावून नासधूस थांबवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

39 दिवसात ठेकेदाराने केले काम पूर्ण
हंबर्डीकर मार्गाचे 16 ऑगस्टपासून प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर 2 सप्टेंबरपर्यंत अर्थात 18 दिवसात काँक्रिटीकरण पूर्ण झाले तर 21 दिवस क्युरींगसाठी लागल्यानंतर शुक्रवारी या कामाचे लोर्कापण झाल्याने वाहनधारकांसह या मार्गावरील व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे 39 दिवस मार्ग बंद असल्याने व्यापार्‍यांना आर्थिक झळ बसली मात्र विकासासाठी व्यापार्‍यांनी सहकार्य केले.

ज्येष्ठ नेते आमदार खडसेंना डावलले
वरीष्ठ सभागृहाचे ज्येष्ठ नेते असलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांना कार्यक्रमास बोलावण्याचे टाळण्यात आल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्याधिकार्‍यांना या संदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी प्रशासकांना विचारा, असे उत्तर दिले.